ऍड. पुनाळेकरांनीच दिला शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : विक्रम भावे घटनास्थळाची रेकी केल्याचे स्पष्ट

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील हल्लेखोर शरद कळसकर याला ऍड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. तर विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे.

ऍड. पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधात बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात 13 पानी पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ऍड. पुनाळेकर यांनी दिला. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली. हत्या केल्यानंतर तेथून कसे फरार व्हायचे याबाबत कळसकर आणि अंदुरे यांना मार्गदर्शन केल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रातून स्पष्ट केले आहे.

कळसकर याने दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात दिलेल्या कबुलीजबाबावरून ऍड. पुनाळेकर आणि भावे यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. ऍड. पुनाळेकर यांना जमीन देण्यात आला आहे तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने सीबीआय दिली असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.