डीएसकेंवरील आरोप दिशाभूल करणारे

ऍड. श्रीकांत शिवदे यांचा न्यायालयात युक्‍तिवाद

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत आहेत. परंतु त्यांच्यावर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केलेले पैशांच्या गैरव्यवहाराचे आरोप गुंतवणूकदारांची दिशाभूल करणारे असल्याचा युक्‍तिवाद डीएसके यांचे वकील ऍड. श्रीकांत शिवदे यांनी बुधवारी सत्र न्यायाधीश जयंत राजे यांचे न्यायालयात केला.

ऍड. शिवदे म्हणाले, “डीएसके यांनी गुंतवणूकदारांच्या पैशांतून 21 लाखांचे ब्रॅंडेड कपडे, 39 हजारांचे बूट, 25 लाखांची आर्कषक घरसजावट, 14 लाखांचे इतके कपडे घेतले असे सांगत हे खर्च त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे वापरून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वस्तुस्थिती वेगळी असून अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगून गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. यामुळे गुंतवणूकदार यांचा डीएसके यांच्याबद्दल गैरसमज झाला आहे. या पैशांतून फुटबॉलचे ग्राउंड उभारले. प्रत्यक्षात खेळाडूंसाठी त्यांनी पुण्यातील एकमेव दर्जेदार फुटबॉल मैदानाची निर्मिती केली. त्यांच्या सर्व कंपन्या अधिकृत आणि नोंदणीकृत असून त्यांनी वेळोवेळी कर भरलेला आहे.

कारवाई होण्यापूर्वी त्यांचा द्रुतगती महामार्गावर अपघात झाला आणि त्यात त्यांचा चालक गेला. तर, ते स्वतः अनेक महिने आजारी होते. पोलीस कोठडीत आजारी असताना त्यांनी वैद्यकीय तपासणी मागणी केली, तेव्हा त्यांना पोलिसांनी सहकार्य केले नाही. आजारपण आणि ज्येष्ठत्वामुळे त्यांची बेडची मागणी मान्य केली नाही. त्यांना वेळोवेळी जामीन नाकारणे म्हणजे जिवंतपणी मरणयातना दिल्यासारखे आहे. त्यांचा पासपोर्ट आधीच न्यायालयात पोलिसांनी जमा केलेला आहे, त्यामुळे ते कुठे जाऊ शकत नाही.

दोन वर्षांपासून आर्थिक फसवणूक गुन्ह्यातील फॉरेन्सिक रिपोर्टची आमची मागणी प्रलंबित आहे. अशा प्रकरणात फॉरेन्सिक ऑडिटर असणे गरजेचे आहे, पण ती मागणी मान्य होत नाही. या पार्श्‍वभूमीवर डीएसके यांना जामीन देण्यात यावा.’

Leave A Reply

Your email address will not be published.