कोरोनाच्या काळात अदानी, अंबानींच्या संपत्तीत तुफान ‘वाढ’; जाणून घ्या कोणाची किती संपत्ती

भारतातील अब्जाधीशांची संख्या 177

मुंबई – कोव्हीड आजाराचा प्रादुर्भाव असताना गेल्या वर्षी भारतातील श्रीमंतांची श्रीमंती आणखी वाढली आहे. भारतातील क्रमांक एकचे श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 24 टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

त्यांच्याकडे आता 83 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. दुसऱ्या क्रमांकावरील गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षी त्यांच्या संपत्तीत 20 टक्के वाढ होऊन त्यांची संपत्ती 32 अब्ज डॉलर इतकी झाली. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांची संपत्ती गेल्या वर्षी 128 टक्‍क्‍यांनी वाढून 9.8 अब्ज डॉलर इतकी झाली. तिसऱ्या क्रमांकावर एचसीएल टेक्‌ कंपनीचे शिव नादर असून त्यांच्याकडे 27 अब्ज डॉलर आहेत.

नवे 40 अब्जाधीश
लॉक डाऊनमध्ये भारतामध्ये श्रीमंताच्या श्रीमंतीत जास्त वाढ झाली असून या वर्षी नवे 40 अब्जाधीश निर्माण झाले. त्यामुळे भारतातील एकूण अब्जाधीशांची संख्या 177 झाली आहे. एकीकडे संपूर्ण वर्षातील विकास दर उणे 7 टक्के होणार असतानाच अब्जाधीशांची संख्या मात्र वाढत आहे.
हा अहवाल तयार करणाऱ्या हरून इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान जुनैद यांनी सांगितले की, भारतातील संपत्ती निर्माते परंपरागत उद्योगातील आहेत. भारतातील संपत्ती चीन किंवा अमेरिकेप्रमाणे तंत्रज्ञान आधारित नाही. जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर भारतातील अब्जाधीशांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त होऊ शकेल.

मुंबई, दिल्लीत संख्या जास्त
भारतातील 177 अब्जाधीशापैकी मुंबईतील 60 व दिल्लीतील 40 आहेत. बंगळुरूतील अब्जाधीशांची संख्या 22 आहे. चीनध्ये सर्वात जास्त अब्जाधीश असून त्यांची संख्या 1058 आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.