मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री ‘तुनिषा शर्मा’ हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने शनिवारी (24 डिसेंबर) दुपारी मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसलं तरी तिच्या आत्महत्येविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, आता पोलिसांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
तुनिषाचा मृतदेह रात्री उशिरा मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला होता. 4 ते 5 डॉक्टर तिच्या शवविच्छेदनच्या वेळी उपस्थित होते. या शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफी तयार करण्यात आली आहे. तिचं शव हे रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शवविच्छेदना नंतर तिचे शव हे कुटुंबियांना देण्यात येईल. त्यानंतर तिचे शव मीरा रोड येथे नेण्यात येईल आणि संध्याकाळी 4 ते 4:30 च्या आसपास तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार ‘शीजान खान’ला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
नेमकं काय घडलं…
तुनिषा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. सेटवर उपस्थित लोकांनी तात्काळ अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण वाटेतच तिचा मृत्यू झाला.