ओरहान पामुक अंतरीच्या गूढ आवाजाचा साक्षीदार

मध्य पूर्वेतल्या टर्की या छोट्याशा देशातला हा तगडा लेखक. त्यांची पुस्तकं जगातल्या 63 भाषांमध्ये अनुवादित झालीत नि विकलेल्या पुस्तकांची संख्या तब्बल दीड कोटींच्या घरात आहे. 14 हून अधिक विद्यापीठांनी मानद डॉक्‍टरेटने गौरवलेल्या ओरहान पामुक यांच्या लेखनाविषयी…

“निर्वासित होण्याची भीती, खिजगिणतीतही नसण्याची भीती अन्‌ त्यासोबत येणारा अपमान, उपेक्षा या मानवतेला असलेल्या मूलभूत धोक्‍यांविषयी साहित्यानं आवाज उठवण्याची गरज आहे,’ असं ओरहान पामुक यांनी 2006 मध्ये नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात म्हटलं होतं. त्यांचं हे विधान त्या काळात टर्कीतल्या सामाजिक-राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आधारित होतं, हे सत्य असलं तरी त्याला एका वास्तवाची किनारही होती. मध्य पूर्वेतला धार्मिक अतिरेक, त्याचे राजकीय पडसाद, हिंसेचं अराजक, या स्थितीत सामाजिक-भावनिक कुचंबणा होणारा तिथला सामान्य नागरिक हे ते वास्तव आहे. याच वास्तवाच्या ढिगाऱ्यावर पाय रोवून पामुक उभे राहतात.

ओरहान पामुक यांचा जन्म इस्तंबूलमध्ये 7 जून 1952 रोजी झाला. त्यांचे आजोबा यशस्वी सिव्हील इंजिनिअर होते. ओरहान यांच्या वडिलांनीही आजोबांचाच व्यवसाय पुढं चालवला. ओरहान यांनी तीन वर्षे आर्किटेक्‍चरचं शिक्षण घेतलं, ते अर्धवट सोडून पत्रकारितेला प्रवेश घेतला आणि मग लेखक बनण्याचा प्रवास सुरू केला. तरुण वयापासूनच ओरहान यांचा सामना मध्यपूर्वेच्या जगण्यातल्या द्वंद्वाशी झाला. संस्कृती, गूढता आणि मानवी भावभावनांतला गुंता यांच्यासह दहशत, उपेक्षा, अपमान यांची ओळख झाली. त्यांच्यातला संघर्षशील लेखक विकसित होत गेला तो तिथूनच. वयाच्या 22 व्या वर्षांपर्यंत त्यांनी चित्रं काढली, त्यातही मध्य पूर्वेतली माणसं, ठिकाणं, संस्कृती यांचं चित्रण पाहायला मिळतं.

त्यांच्या “सेव्हडेट बे अँड सन्स’ या पहिल्या कादंबरीला टर्कीत प्रकाशक मिळायला तब्बल चार वर्षे वाट पाहायला लागली. पण तेही बरंच झालं, कारण या कादंबरीला अप्रकाशित कादंबरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, असंही ओरहान खासगीत सांगतात. ओरहान यांच्या लेखी “ज्या दिवशी एक पानभर का होईना चांगलं लिखाण होईल तोच चांगला दिवस’ असतो.

फेब्रुवारी 2005 मध्ये स्वीस नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत हजारो अर्मेनियन आणि कुर्द नागरिकांच्या हत्येसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ओरहान यांच्यावर टर्की सरकारने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिक्रिया उमटली. टर्कीला युरोपियन युनियनमध्ये सामील करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्‍वभूमीची त्याला किनार होती. ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने टर्की दंड विधानातलं हे कलमच रद्द करून ओरहान यांना मुक्‍त करण्याची मागणी करणारं पत्रक जारी केलं. या मागणीच्या समर्थनात अन्य संस्था आणि लेखकही उतरले. अखेर ओरहान यांची मुक्‍तता करण्यात आली. दरम्यानच्या काळात इंग्लंडमधल्या “प्रॉस्पेक्‍टस’ या नियतकालिकानं केलेल्या सर्वेक्षणात ओरहान यांना जगातल्या बुद्धिवंतांच्या यादीत चौथं स्थान देण्यात आलं. या सगळ्या प्रसंगांतून तावूनसुलाखून निघत ओरहान यांनी आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं.

“सायलेंट हाऊस’, “द व्हाइट कॅसल’, “द ब्लॅक बुक’, “द न्यू लाइफ’, “माय नेम इज रेड’, “स्नो’, “द म्युझियम ऑफ इनोसन्स’, “अ स्ट्रेंजनेस इन माय माइंड’, “द रेड हेअर्ड वूमन’ या कादंबऱ्यांनी त्यांनी साहित्याचं दालन समृद्ध केलं. ओरहान केमाल नोव्हेल प्राइझ, इंडिपेंडंट फॉरेन फिक्‍शन प्राइझ, इंटरनॅशनल डब्लीन लिटररी ऍवार्ड, पीस प्राइझ ऑफ द जर्मन बुक ट्रेड, बुडापेस्ट ग्रॅंड प्राइझ, लिटररी फ्लेम प्राइझ यांच्यासह तीस पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या नावावर आहेत.

“माय नेम इज रेड’ या कादंबरीमुळे ओरहान यांचं आंतरराष्ट्रीय साहित्यिक पटलावरचं स्थान अधोरेखित झालं. ही कादंबरी 16 व्या शतकातल्या इस्तंबूलच्या पार्श्‍वभूमीवर गूढ, प्रेमकथा आणि तात्विक कोडं यांचं मिश्रण आहे. टर्कीतली सुलतानाची राजवट, पूर्व-पश्‍चिम या दरम्यानचे तणाव यावर ती मार्मिक भाष्य करते. समांतर चाललेल्या कथा आणि त्यांची एकमेकांत केलेली कौशल्यपूर्ण गुंफण हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. ही कादंबरी 24 भाषांत अनुवादित झाली असून तिला “इंटरनॅशनल डब्लीन लिटररी ऍवार्ड’ही मिळाला आहे.

“स्नो’ ही रूढीवादी इस्लामिक टर्की आणि आधुनिक टर्कीतल्या अंतर्विरोधावर आधारित कादंबरी आहे. कार्स या सीमेलगतच्या शहराच्या पार्श्‍वभूमीवर याचं कथानक घडतं. आधुनिक विचारांचा एक टर्की कवी कार्स या बर्फाळ शहरात येतो आणि रूढीवादी, कट्टर इस्लामींच्या जाळ्यात अडकतो. या दोन विचारांमधलं द्वंद्व यात चितारलं आहे. या कथानकासोबतच शहरातला निसर्ग, बर्फवृष्टी यांचा ओरहान यांनी अत्यंत खुबीनं प्रतिकात्मक वापर केला आहे. “द म्युझियम ऑफ इनोसन्स’ ही नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर पूर्ण केलेली ओरहान यांची पहिली कादंबरी. त्यातही एका वेगळ्या पार्श्‍वभूमीवरची अपयशी प्रेमकथा आहे.

ओरहान यांचं लेखन पूर्व आणि पश्‍चिमेकडील जीवन, विचारशैली आणि संस्कृतींच्या संघर्षांचं चित्रण करणारं आहे. त्या भागातल्या कला, साहित्य आणि चित्रकला यांच्यातलं वैविध्यही त्यात दिसतं. रूढी-परंपरा आणि आधुनिकता यांच्यात खोलवर रुजलेला संघर्ष हेसुद्धा ओरहान यांच्या लेखणीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. काहींचं लेखन चोरल्याचा आरोपही ओरहान यांच्यावर केला गेला. पण त्यात तथ्य नसून काझी नझरूल इस्लाम, मुरत बर्दाकी यांच्यापासून प्रेरणा घेतल्याचं ओरहान यांनी स्वतः मान्य केलं आहे.

ओरहान यांनी इस्तंबूलच्या स्वतःच्या राहत्या घरातून घेतलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. बदलत्या इस्तंबूलचं चित्रमय दर्शन असणारं हे प्रदर्शन तीन महिने चाललं आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. “माझ्या स्वतःच्या कल्पनेत नसलेली वाक्‍यं, स्वप्नं आणि कादंबरीतली पानं वाचल्यानंतर मला सर्वांत जास्त आनंद होतो. कारण दुसऱ्या शक्‍तीनं ती शोधून माझ्यासमोर सादर केलेली असतात’, असं ओरहान म्हणतात. अंतरीच्या गूढ आवाजाचा प्रामाणिक साक्षीदार असंच ओरहान यांचं वर्णन करावं लागेल.

-डॉ. भालचंद्र सुपेकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.