चंदिगड – निवडणूकीदरम्यान लागू असलेल्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याबद्दल अभिनेता सोनू सूद याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला. पंजाबमधील मोगा जिल्ह्यात त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंजाबमधील 117 विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले. या मतदानाच्यावेळी सोनू सूद मतदारांना प्रभावित करत असल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने सोनू सूद याला मतदान केंद्रांना बेट देण्यास मज्जाव केला होता. मात्र सोनू सूद याने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
सोनू सूदची बहिण मोलविका सूद सचदेव या मोगा येथून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. मोगा जिल्ह्यातील लांडेके गावात सोनू प्रचार करत असल्याची तक्रार मिळाली होती. या ठिकाणी सोनू सूद उपस्थित असणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्याचे मोगाच्या पोलीस अधिक्षकांनी सांगितले.