वाघोली, – शिरूर मतदारसंघातील वाहतुकीचा प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी उड्डाणपूल आणि मेट्रो प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. या कामांमुळे वाहतुकीचा प्रश्न कायमचा संपुष्टात आणणार, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाघोली येथे दिली.
काही हजार कोटींची ही कामे मार्गी लावायची आहेत, यासाठी मोदींना साथ देणारा माणूस म्हणून आढळराव संसदेत पाहिजेच असे आवाहन त्यांनी आढळरावांच्या प्रचारार्थ आयोजित वाघोली येथील सभेत बोलताना केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम चौधरी, माजी आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, शिवसेना नेते मिलिंद हरगुडे, सुरेश घुले,
वैशाली नागवडे, दादासाहेब सातव, रोहिदास उंद्रे, भगवान शेळके, धर्मेंद्र खांडरे, शामराव कोतवाल, संदीप सातव, संदीप कांचन, तसेच महायुतीचे विविध घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या 20 वर्षांपासून महामार्ग, पुणे-नाशिक रेल्वेसाठी मी पाठपुरावा करतोय. बैलगाडा शर्यतीसाठी लढा दिलाय. या श्रेय विरोधी उमेदवार घेतात.
दोन चार वर्षात अशी कामे होतात का? असा प्रश्न त्यांनी केला. पराभव दिसायला लागल्याने खोटेनाटे आरोप, व्यक्तीगत पातळीवर होत आहे. मी वनखात्याची जमीन लाटली असा आरोप केला. पण माजी सैनिक असलेल्या माझ्या भावाला सरकारने जमीन दिली. त्यांनी या वक्तव्यातून माजी सैनिकाचा अपमान केला आहे. पराभवाच्या छायेतून ते आरोप करत आहेत.
माझ्या घरात आईवडीलांचा नाही, तर शिवछत्रपतींचा फोटो आहे. त्यांची शिवशाही आणि प्रभू श्रीरामाचं रामराज्य आम्हाला आणायचे आहे. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या एकतरी मशिद तोडली का; मात्र काँग्रेसकडून शिवशाहीचा विचार करून मार्गक्रमण करणार्यांवर गरळ ओकली जात आहे. याला कोणताच मतदार थारा देणार नाही. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
पुणे-नगर रस्त्यालगत तिसर्या पुण्याचा विचार करायला लागेल. पुढील 20 ते 50 वर्षांचा विचार करून मतदार संघातील वाहतूक, पिण्याचे पाणी, रस्ते, कचरा अशा विविध समस्या सोडविण्यासाठी, पुणे वाघोली मेट्रो मंजूर करून ती वढूपर्यंत आणण्यासाठी, मुळशीचं पाणी या भागात आणायचंय त्यासाठी केंद्राचा निधी आणावा लागेल. देशाची अर्थव्यवस्था बळकट करणार्या मोदींच्या पाठबळासाठी आढळराव यांना संधी द्या. -अजित पवार, उपमुख्यमंत्री