प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 20 -उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यांवरील मंडपांसाठी नियम घालून देण्यात आले असून, या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर मंडळावर महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, परवाना दिल्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मंडळांच्या मांडवाची महापालिका, महसूल विभाग तसेच पोलिसांची संयुक्त पथके प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी करणार आहे. त्यात नियमांचे उल्लंघन झालेले असल्यास अथवा मंडळांकडून वाहतुकीस अडथळा करुन मंडप उभारला असल्यास कारवाई केली जाणार आहे.
शहरात करोना संकटामुळे गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा झाला. त्यामुळे मंडळांनी यंदा मोठ्या प्रमाणात उत्सवाची तयारी केली आहे. मंडळांनी यंदा पालिकेने नव्याने परवाने न देता 2019 मध्ये दिलेले परवानेच पुढे कायम ठेवावेत, अशी मागणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे मंडळांना यंदा 2027 पर्यंतचा परवाना मिळणार आहे. मात्र, मंडळांना मंडप घालताना 2019 च्या परवान्यासोबत दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
काही प्रमुख नियम…
मंडप घालताना रुग्णवाहिका, रिक्षा, दुचाकी व पीएमपीसाठी रस्ता मोकळा सोडावा
वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी मंडप किमान 18 फूट उंच असावा
रनिंग मंडप 50 मीटरपेक्षा अधिक नसावा
जाहिरात कमानीची खालील बाजू मोकळी असावी
निश्चित केलेल्या जागेतच मंडप असावा
जास्त जागेचा मंडप घालू नये
आवश्यकतेनुसार स्वयंसेवक, सुरक्षारक्षक नेमावेत
इथं करता येणार तक्रार
गणेश मंडळांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. या शिवाय, 9689900002 या मोबाईल क्रमांकावर व्हॅट्सप तक्रार करता येणार असून, अतिक्रमण विभागाच्या कार्यालयात 020-25501398 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तक्रारींचे निराकरण क्षेत्रीय कार्यालये तसेच स्थानिक पोलिस स्थानकतही केले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.