सातारा – सुमारे 70 विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे के. एस. डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळा या दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करुन त्याचा अहवाल सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आज दिले.
राज्याचे शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू आढावा बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सरदार उर्फ सागर भोगांवकर यांनी सातारा येथील के. एस. डी. शानभाग व जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे दोन्ही शाळांनी चाचणी परीक्षेस बसू दिले नव्हते.
यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले या संदर्भात बच्चू कडू यांना निवेदन दिले. भोगांवकर यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, के.एस.डी. शानभाग विद्यालय विनाअनुदानित असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून फी आकारली जाते.
परंतु या फीवर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. काही पालकांनी वेळेत फी न भरल्याने 10 जानेवारी रोजी शालेय चाचणी परीक्षा असतानाही सुमारे पाच ते सहा विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने परीक्षेला बसू न देता त्यांना मुख्याध्यापकांच्या दालनात दिवसभर बसवून त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले. त्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे.
याबाबत पालकांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली न गेल्याने याचा विद्यार्थ्यांवर मोठा मानसिक आघात झालो. तसेच दुसऱ्या प्रकरणात साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेतील जानकीबाई प्रेमसुख झंवर शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना फी वेळेत न भरल्याने चाचणी परीक्षेस बसू दिलेले नाही.
त्यांना शाळेच्या प्रांगणात दिवसभर उभे करण्यात आले. हे निवेदन वाचल्यानंतर मंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर यांना या दोन्ही शाळांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच या संदर्भातील अहवाल सोमवारी दि. 13 रोजी तत्काळ सादर करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील इतर शाळांमधूनही अशाच प्रकारे नियमबाह्य फी वसुली होत असेल तर अशा शाळांवरही कारवाई करण्याचे आदेश कडू यांनी अधिकाऱ्यांना दिले.