मुंबई – निलंबनाच्या कारवाईलाही न जुमानता एसटी कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवला आहे. बरेचसे कर्मचारी कामावर परतले असले तरी अजुनही संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्या पार्श्वभूमीवर संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत 257 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
महामंडळाने दिलेल्या माहीतीनुसार, बुधवारी 27 एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 257 झाली आहे. एसटीतील 111 कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही एकूण दहा हजार 451 झाली आहे.
निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचना असतात. त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात सामिल असलेल्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणीही बदल्या केल्या जात आहेत. बुधवारी 52 कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. एकूण 2 हजार 624 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.