पारनेर -पारनेर महसूल पथकाने दैठणे गुंजाळ येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई केली. ही कारवाई आज करण्यात आली. तालुक्यातील अवैध वाळूवाहतूक रोखण्यासाठी पथके नेमण्यात आल्याची माहिती यावेळी तहसीलदार ज्योती देवरी यांनी दिली आहे.
दैठणे गुंजाळ येथे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक सकाळपासून तैनात करण्यात आले होते. या पथकास एक डंपर (क्र.ओडी-06 जीसी 6166) विना परवाना वाळू वाहतूक करत असल्याचे निदर्शना आले. पथकाने हा डंपर व त्यावरील चालक अमोल अहिरे (रा. कन्हेर, ता. पारनेर) यास ताब्यात घेतला. या डंपरमध्ये दीड ब्रास वाळू आढळून आली. या पथकात तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह मंडळ अधिकारी सचिन पोटे, नंदकुमार साठे, दीपक कदम आदींचा समावेश होता.
दरम्यान अनेक दिवसांपासून टाकळी ढोकेश्वर, मांडवा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत होती. मात्र महसूल प्रशासन करोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कारवाई करण्यास अडचणी येत होत्या. मात्र अशाही परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असून, महसूल विभागाची पथके त्यासाठी तयार करण्यात आल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.