मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता शेवटचे 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावल्याचे पहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये भाजप-शिवसेनेची संयुक्त प्रचारसभा आज सायंकाळी ६ वाजता वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी बोलताना 370 प्रमाणेच आता सरकारने राम मंदिराचा निर्णयही घ्यावा असे म्हटले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाव न घेता टीका केली होती. मोदी जाहीर सभेत म्हणाले होते की, गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून काही वाचाळवीर लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयावर आपला विश्वास ठेवायला हवा. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, यावर सुनावणी सुरू आहे, सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेळ काढून बाबी ऐकून घेत आहे. मग मला कळत नाही, की हे वाचाळवीर लोक कुठून उगवले आहेत? या प्रकरणी ते खोडा का घालत आहेत? आपला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असला पाहिजे.
त्यानंतर आता प्रचाराच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आज मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने राम मंदिर होणारच असे म्हटले आहे. त्यामुळे राम मंदिराचा विषय सभेमध्ये चर्चिला जाण्याची शक्यता आहे.