पिंपरी (प्रतिनिधी):”लॉकडाऊन’च्या काळात भुईसपाट झालेला आलेख दारू विक्रीला परवानगी मिळताच पुन्हा उसळी घेऊ लागला आहे. शहरात शांतता आणि सुरक्षिततेचे वातावरण अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी वाकड आणि दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार्यरत असलेल्या अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर मोक्काची (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन 1999) कारवाई केली आहे. यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळी प्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मणनगर, थेरगाव), धीरज श्रीकांत शिंदे (वय 22, रा.जीवननगर, ताथवडे), अजय सुधाकर शिरसाठ (वय 22, रा. जीवननगर, ताथवड), मयूर शिवाजी भोसले (वय 23, रा. जीवननगर, ताथवडे), समीर बोरकर, अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आरोपींनी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्यांच्या विरोधात बुधवारी (दि. 27) मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळीप्रमुख अविनाश बाळू धनवे (वय 29, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), ऋषिकेश हनुमंत गडकर (वय 23 रा. काळे कॉलनी, देहूफाटा) जगदीश संजय काकडे (वय 20 रा. इंद्रायणी पार्क, पद्मावती रोड, स्वातीकृपा मंगल कार्यालया शेजारी, आळंदी) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपीदेखील वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर बुधवारी (दि. 27) मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अपर आयुक्त, रामनाथ पोकळे उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील विनायक ढाकणे, सहायक आयुक्त आर. आर. पाटील रामचंद्र जाधव श्रीकांत मोहिते, यांच्या मार्गदशनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, पीसीबी गुन्हे शाखेचे निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करून करून त्याची छानणी केली. तसेच पीसीबी शाखेतील पोलीस हवालदार सचिन चव्हाण, वाकड पोलीस ठाण्यातील सुहास पाटोळे, पोलीस नाईक देडे यांनी हा प्रस्ताव तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.