पुणे(प्रतिनिधी) : लष्कर परिसरातील विविध भागांमध्ये करोनाचा विस्तार वाढत असून भीमपुरा, मोदीखाना परिसरपाठोपाठ आता बुटी स्ट्रीट मार्ग परिसर येथेही करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निदर्शनास आले आहे. लष्कर परिसरात वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत बोर्डातर्फे लॉकडाऊनची मुदत 31 मेपर्यंत वाढविण्यात आली असून, त्याबाबची सूचना प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
कॅटोंन्मेंट हद्दीतील प्रामुख्याने भीमपुरा, मोदीखानासह आता बुटी स्ट्रीट परिसरातही करोना बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी केले आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कॅटोंन्मेंट बोर्डाने लॉकडाऊनचा कालावधी तीन दिवसांनी वाढवला असून, 29 ते 31 मेपर्यंत कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये पूर्णत: लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत बोर्डाच्या हद्दीतील फक्त दूधविक्री आणि औषधांची दुकाने खुली राहणार आहे. मात्र, नागरिकांच्या सोयीसाठी 28 मे रोजी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली राहणार आहेत. लॉकडाऊन कालावधीत केवळ दूध आणि औषधे विक्रीची दुकाने सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
दरम्यान, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर परिसरातील संशयितांच्या नमुना तपासणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातर्फे एप्रिलमध्ये दररोज सरासरी 30 ते 40 रुग्णांचे स्वॅब घेऊन ते “एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविले जात होते. आता मेमध्ये दररोज सरासरी 100 ते 150 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जात आहेत.