पिंपरी -अनेक चालक अतिशय वेगाने कार चालवित असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. अशा वाहन चालकांवर परिवहन कार्यालयाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येते. मात्र, त्यानंतरही अनेक कार चालक वेग मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. अशा उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 239 कार चालकांवर फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
महामार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याने होणाऱ्या अपघातांचे तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकामार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी, इंटरसेप्टर वाहनांत बसविण्यात आलेल्या स्पीडगनच्या पुणे-नाशिक व पुणे मुंबई महामार्गांवर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 तर आतापर्यंत 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक उत्तम राठोड, तानाजी धुमाळ, भालचंद्र कुलकर्णी व सोनाली पोद्दार यांनी केलेली आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांनी केली आहे.
बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई
बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या 20 दुचाकी वाहनांवर गेल्या महिनाभरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली आहे. कारवाई अंतर्गत एकूण 1 लाख 46 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले, गेल्या महिनाभरात 20 दुचाकी वाहनांबाबत कारवाई केली आहे. एकूण 1 लाख 46 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याशिवाय, संबंधितांच्या नोंदणी प्रमाणपत्राचे निलंबन देखील केले आहे. येथून पुढील काळात देखील अशा प्रकारे बेकायदा प्रवासी वाहतूक असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.