पिंपरी -औषध खरेदीसाठी महापालिकेच्या भांडार विभागाने निविदा प्रक्रिया जलदगतीने न राबविल्यामुळे महापालिकेच्या सर्वच रूग्णालयात एक महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे काही रूग्णांना औषधे, गोळ्या बाहेरून घ्यावा लागल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाअंतर्गत 28 दवाखाने आणि आठ रूग्णालयांसह नव्याने निर्माण केलेली करोना रूग्णालये तसेच नवीन आकुर्डी, थेरगाव आणि भोसरी रूग्णालये चालविली जात आहेत. महापालिकेची रूग्ण सेवा चांगली असल्याने शहर परिसरासह पुणे जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य नागरिकांसह आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक पालिका रूग्णालयात उपचारासाठी येतात. एकट्या वायसीएम रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागात (ओपीडी) दररोज पंधराशे ते सोळाशे रूग्ण उपचार घेत असून वर्षाला चार ते साडेचार लाख रूग्ण उपचार घेत आहेत.
असे असताना महापालिकेच्या भांडार विभागाच्या लेट लतीफ कारभारामुळे औषध खरेदीची निविदा प्रक्रिया वेळेत पार पडली नाही. महापालिकेच्या रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून महत्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रिया झाली असून येत्या 7-8दिवसात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
22 कोटींच्या खरेदीला मंजुरी
आवश्यक असणारी ऍलोपॅथिक औषधे खरेदी 25 पुरवठादारांकडून केली जाणार आहे. 761 प्रकारची ही विविध औषधे खरेदीसाठी 21 कोटी 94 लाख रूपये इतका खर्च होणार आहे. याबाबत आयत्यावेळच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. वैद्यकीय विभागाच्या मागणीनुसार महापालिका रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे, साहित्य खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या निविदेत 29 पुरवठादारांनी सहभाग घेतला. कागदपत्रांच्या छाननीत औषध खरेदी निविदा समितीची मान्यता घेऊन एकूण 239 कंपन्यांपैकी 164 कंपन्या पात्र आहेत. या निविदा प्रक्रियेमध्ये ऍलोपॅथी औषधांच्या 929 औषधांच्या विविध बाबींकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील 104 औषधांसाठी दर प्राप्त झाले नाहीत. तसेच 51 औषधांसाठी कंपन्या अपात्र ठरल्या आहेत.
शंभरहून अधिक औषधांसाठी एक-दोन निविदा
29 निविदाधारकांनी 774 औषधांसाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 20 टक्के कमी किंवा जास्त दर सादर केले आहेत. 53 औषधांसाठी एकच निविदा आली आहे. 64 औषधांसाठी दोन निविदा आल्या आहेत. तर, 167 औषधांसाठी तीनपेक्षा जास्त निविदाधारकांनी भाग घेतला आहे. निविदा अटी-शर्तीनुसार 10 ते 20 टक्के यामध्ये 323 औषधे आहेत. तर, 167 औषधांसाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 10 टक्क्यांनी जास्त दर आले आहेत. 29 पुरवठादारांनी 164 पात्र कंपन्यांपैकी 284 औषधांसाठी अंदाजपत्रकीय दरापेक्षा 20 टक्क्यांहून कमी दर सादर केले आहेत. तर, 10 ते 20 टक्क्यांमध्ये 323 औषधे आहेत. 10 टक्क्यांपेक्षा जास्त दर असलेली 167 औषधे आहेत. त्यापैकी 154 औषधांची तातडीची गरज असल्याची आहेत. त्यानुसार 761 औषधे लघुत्तम दर सादर केलेल्या 25 पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येणार आहेत. या पुरवठादारांनी 27 कोटी 48 लाख या अंदाजपत्रकीय दरापेक्षा 20.16 टक्के म्हणजेच 21 कोटी 94 लाख रूपये कमी दर सादर केला आहे.