सातारा – शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अमीर इम्तियाज मुजावर आणि त्याच्या सात साथीदारांना मोका लागू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कार्यभार स्वीकारताच संघटित गुन्हेगारीच्या विरोधात कारवाईचे शस्त्र उपसले आहे. संघटित गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियमाद्वारे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना कारवाईसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.
अमीर इम्तियाज मुजावर (वय 22, रा. पिरवाडी), अमीर सलीम शेख (रा. वनवासवाडी), अबू उर्फ अभिषेक राजू भिसे (वय 20, रा. काळे वस्ती झोपडपट्टी,यश ढाब्यापाठीमागे सातारा), आहद शेख, ओमकार राजू भिसे (रा. काळे वस्ती मोळाचा ओढा, सैदापूर), संग्राम विजय जाधव (भक्तवडी, ता. कोरेगाव), यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा), आयुब अत्तार (426, शनिवार पेठ) यांच्याविरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यश संजय बिडकर (रा. व्यंकटपुरा) हा त्याच्या मित्रांसमवेत सेंट पॉल हायस्कूल येथे दि. 4 ऑक्टोबर रोजी दांडिया खेळण्यास गेला होता. दांडिया खेळून ते सर्व जण गेटसमोरील रस्त्यावर जाताना अभिषेक भिसे याने यश बिडकर यांचा मित्र सर्वेश महाडिक यांच्या पायावर गाडी घातली.
त्यावेळी अभिषेक भिसे यांच्या गाडीवर मागे बसलेला अमीर शेख आणि यश बिडकर व त्यांचे मित्र यांच्यात बाचाबाची झाली. अमीर शेख, अभिजीत भिसे, साहिल सावंत, सहद आतार व विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यात जोरात भांडणे झाली होती. सेंट पॉल हायस्कूल येथे बाचाबाची झाल्याच्या कारणावरून चिडून दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बेकायदा जमाव जमवून दोन मोटरसायकलवरून मंगळवार पेठेतील मनामती चौकात यश उभा असताना आमिर शेख याने “आज तुला सुट्टी देत नाही तुला जिवंत ठेवत नाही,’ असे म्हणून त्याच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली.
फिर्यादीने चलाखीने नेम चुकवला, तेथे असणारे घडशी काका यांनी अमीर शेख यास असे करू नका, असे सांगत असताना आमिर शेखने पुन्हा डोक्याला पिस्तूल लावून शूट करतो असे म्हणून पिस्तुलाचा खटका दाबला. परंतु मिसफायर झाला. त्यावेळी अभिजित भिसे( रा. यश ढाब्याच्या पाठीमागे), साहिल सावंत (रा. कोटेश्वर मंदिराजवळ) आहद आयुब याने “ठोक त्याला’ असे म्हणून ओरडत होते. विधी संघर्षीत बालक हातामध्ये मोठा लांब कोयता घेऊन बिडकरला मारण्यासाठी धावला, लोकांनी त्याला पकडले.
यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासानंतर टोळीप्रमुख अमीर इम्तियाज मुजावर याने कट रचून गुन्हा करण्यासाठी “ए एम’ नावाच्या टोळीतील सदस्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी याबाबतची माहिती संकलित करून मोकाचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर केला होता. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी मंजुरी दिल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुजावर टोळीला मोक्का लावण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.