पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 7) शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबविले. 15 ठिकाणी नाकाबंदी तर 24 ठिकाणी कोंबिंग करत रेकॉर्डवरील, फरार, तडीपार आरोपींना चेक केले. या ऑपरेशनमध्ये 45 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये पोलिसांनी गॅंगस्टर, हिस्ट्रीशिटर, फरारी, तडीपार केलेल्या 255 आरोपींना चेक केले. 45 आरोपींना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. कारवाई दरम्यान तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात चाकण येथील कासव तस्करीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
पिंपळे निलखमध्ये असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिराचे कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली. त्या घटनेतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या, तसेच खंडणी,जबरी चोरी ने दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 520 पोलिसांनी या कोंबिंग मध्ये सहभाग घेतला.