किव (युक्रेन) – बेलारुसमधील प्रशासनाने गुरुवारी सर्व प्रमुख वृत्तसंस्थांच्या वेबसाइटवर बंद केल्या आणि अनेक प्रमुख पत्रकारांना ताब्यात घेतले. बेलारुसच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली. अनियंत्रित बेकायदेशीर माहिती पोस्ट केल्याचा आरोप सरकारी वकिलांच्या कार्यालयाने केल्यानंतर माध्यमांवरील हे कारवाईचे पाऊल उचलण्यात आले.
नाशा निवा या प्रमुख वृत्तसंस्थेची वेबसाइट बंद करण्यात आली. तसेच या वृत्तसंस्थेच्या कार्यालयाची झडतीही घेण्यात आली. त्याचे मुख्य संपादक याहर मार्टिनोविच आणि संपादक आंद्रे स्कर्को यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या अपार्टमेंटचीही तपासणी करण्यात आली. अन्य चार पत्रकारांशी संपर्क साधला जाऊ शकत नसल्याचेही बेलारुसमधील पत्रकारांच्या संघटनेने म्हटले आहे.
यापूर्वी मे महिन्यामध्ये टूट बाय या आणखी एका स्वतंत्र वृत्तसंस्थेची वेबसाईटदेखील अशाच प्रकारे बंद करण्यात आली होती. प्रसिद्धी माध्यमांवरील या अघोरी कारवाईने तत्कालिन सोव्हिएत रशियाच्या काळातील निर्बंधांची आठवण होत असल्याचे बोलले जात आहे. बेलारुस हा देखील पूर्वी सोव्हिएत रशियाचाच भाग होता. नाशा निवा आणि टूट बाय दोन्हीने बेलारूसचे हुकूमशहा अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या विरोधात अनेक महिने जारदार वार्तांन केले होते.