बेल्हे -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना म्हणून मास्क न लावता दुचाकीवरून फिरणे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या बेफिकीर लोकांवर कारवाई सुरू केली आहे.
गेल्या तीन दिवसांत बेल्हे आणि परिसरात 180 जणांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. तर 3 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तीन लोक गाडीवर बसून फिरताना दिसले तर त्यांच्यावरही कारवाई केली जात आहे. बेल्हे एस. टी. स्टॅंड, मुक्ताबाई मंदिर, अळकुटी रोड आदी ठिकाणी उभे राहून पोलीस कारवाई करत आहेत. तसेच दुकाने वेळेत बंद न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई होत आहे.
आळेफाटा पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नरेंद्र गोराणे, एस. एस. फड, गोरक्ष हासे, एम. टी. काठमोरे, शिंदे आदी पोलीस टीम कारवाई करत आहे. पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर यांचे याकामी पोलिसांना मोलाचे सहकार्य मिळत आहे.