अकोलेत पावसाचे थैमान; रतनवाडीत 14 इंच पाऊस

भंडारदरा साडेतीन टीएमसी, टिटवी, बलठण ओव्हरफ्लो, पाडोशी भरण्याची चिन्हे
अकोले – रतनवाडी, घाटघरला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा तडाखा बसला असून भंडारदरा धरणाने साडेतीन टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. टिटवी, बलठण हे लघु जलाशय ओवरफ्लो झाले असून पाडोशी भरण्याची चिन्हे आहेत. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे थैमान सुरूच राहिले. रतनवाडीला 14 इंचाच्या जवळपास पावसाने हिसका दाखवून तडाखा दिला व त्याच बरोबर घाटघर येथे 8.5 इंच पाऊस पडून याही गावाला अतिवृष्टीने आपल्य अस्तित्वाची चाहूल दिली.

या गावांना लागोपाठ दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाल्याने येथील जनजीवन गारठून गेले आहे. सामान्य जनतेला अगदी जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. अकोले तालुक्‍याच्या पूर्व भागात पावसाची काहीशी उघडीप काल व आज राहिली. तथापि भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मात्र पावसाने उसंत मिळू दिली नाही. रतनवाडीला या हंगामातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर वाकी सहा व भंडारदरा व पांजरे येथे साडेपाच इंच पावसाची नोंद झाली.

टिटवी हा लघुपाटबंधारे विभागाचा तलाव आज सकाळी नऊ वाजता भरला. प्रवरा खोऱ्यामध्ये मोडणारा हा प्रकल्प 303 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचा आहे. त्याच्याबरोबर मुळा खोऱ्यातील कुरकुंडी उपनदीवर असणारा बलठणचा लघुपाटबंधारे प्रकल्प हा आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला. या प्रकल्पाची क्षमता 202 दशलक्ष घनफूट इतकी आहे. आढळा खोऱ्यात असणारा पाडोशी प्रकल्प आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत भरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसे झाल्यास त्या प्रकल्पातून अतिरिक्तचे पाणी हे आढळा नदीत वाहू लागेल व त्यानंतर सांगवी येथील लघु जलाशय पूर्ण क्षमतेने भरेल आणि आढळा नदी वाहती होईल. कस नदीवर असणारा बेलापूर बदगीच्या व कोतूळ जवळील बोरीच्या लघु जलाशयात पावसाचे जमा होऊ लागले आहे. आतापर्यंत हे तलाव कोरडे राहिलेले होते. मात्र त्यांच्यातही पाणी जमायला सुरुवात झालेली आहे. सद्या धरणे रिक्त असल्याने वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जाणार नाही, अशा प्रकारची माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता आर. डी. आरोटे यांनी प्रतिनिधीला दिली. भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये मोडणारे रतनवाडी, उडदावणे, पांजरे, साम्रद, शिंगणवाडी, घाटघर या गावांमध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसाने सर्वांचीच दैना उडवली असून तेथे गारठा तयार झाल्याने सर्वांना चिंतेत टाकणारे चित्र निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये माणसांबरोबर जनावरांचे सुद्धा हाल होत असल्याची माहिती घेता समजले.

आज दुपारी राजूर जवळील गांजवणे घाटामध्ये दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. जिल्हा परिषद सदस्य डॉ.किरण लहामटे यांनी तातडीने भेट देऊन ती वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सहकार्य केल्याची माहिती उपलब्ध झाली. भंडारदरा धरणामध्ये आज सकाळी 3 हजार 774 दशलक्ष घनफूट म्हणजेच पावणे चार टीएमसी पाणीसाठा झाला होता.गेल्या 24 तासात या धरणामध्ये 226 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली होती. येणाऱ्या नवीन पाण्याच्या आवकेमुळे हे धरण आज रात्री चार टीएमसीचा आकडा पार करील अशी परिस्थिती आहे. निळवंडे धरणामध्ये 1 हजार 230 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला असून या धरणामध्ये आज सकाळी चोवीस तासात 113 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. मुळा धरणाने सहा टीएमसीचा अंक पार केला असून या धरणात सकाळी सहा हजार 83 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. या धरणामध्ये तीस हजार क्‍युसेक इतका नवीन पाण्याचा प्रवाह येऊन मिळत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये या धरणात 257 दशलक्ष घनफूट इतकी आवक झाली होती. 24 तासांत पावसाची नोंद- घाटघर – 215, रतनवाडी – 342, पांजरे – 131,वाकी – 152, भंडारदरा – 140, निळवंडे – 6,आढळा- 5, अकोले – 16, कोतूळ – 18.

Leave A Reply

Your email address will not be published.