सदाशिव पेठेत युवकावर अॅसिड हल्ला

टिळक रस्त्यावरील घटना : पोलिसांवरही गोळीबार

पुणे – सदाशिव पेठेतील टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर अज्ञाताने अॅसिड टाकल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत जखमी झालेल्या युवकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी अज्ञाताला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्याचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

या घटनेत अॅसिड टाकल्यामुळे रोहित थोरात (वय 25) हा युवक जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादशाही हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळच्या सुमारास एक युवक मैत्रिणीबरोबर थांबला होता. त्यावेळी एक युवक चालत तेथे आला व त्याने रोहितच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकले. यावेळी गोळीबार झाल्याचा जोरदार आवाजही झाला. काही समजायच्या आत हल्लेखोर पसार झाला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या युवकाच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस व गुन्हे शाखेतील पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनेनंतर विश्रामबाग पोलिसांचे पथक टिळक रस्त्यावरील एका इमारतीत गेले. अॅसिड हल्ला करणारा युवक इमारतीत असलेल्या सदनिकेत घुसल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथकाने युवकाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्या युवकाने पिस्तुलातून दोन गोळ्या पोलिसांवर झाडल्या. रात्री उशिरापर्यंत युवकाला ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती.
जखमी झालेल्या युवकाला बोलता येत नसल्याने पोलिसांना माहिती मिळवता आली नाही. युवकाबरोबर असलेल्या युवतीचे नाव-पत्ता समजला नसल्याने अॅसिड हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहितीही पोलिसांना मिळाली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.