पाचगणी – महाबळेश्वरनजीक आचली गावातील साकव पुलाचा स्लॅब निकृष्ट असल्यामुळे १० दिवसांत कोसळला. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गोंजारी यांना धारेवर धरत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना घेरुन प्रश्नांची सरबत्ती केल्याने गोंजारीची बोबडी वळली.
अंदाजपत्रकाला फाटा देऊन निकृष्ट काम करणाऱ्या उपअभियंता गोंजारीवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना स्टाईलने भ्रष्टाचाराचा बुरखा फाडू, असा इशारा महाबळेश्वर तालुका शिवसेनेकडून देण्यात आला.
सार्वजनिक बाधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे आचली गावातील साकव पुलाचा स्लॅब १० दिवसांत कोसळला. महाबळेश्वर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश जाधव यांनी उपअभियंत्यांनी साकव पुलाला वापरलेले स्टील, सिंमेंट, खडी यांची गुणवत्ता व प्रमाण न तपासता महमंद तुघलघी कारभाराचा फटका पूल पडण्यास कारणीभूत असल्याचा आरोप गोंजारी यांच्यावर केला. तालुक्यांतील बांधकामाच्या विकास कामात स्लीपिंग पार्टनर म्हणून उपअभियंता गोंजारी असल्याने ठेकेदार मनमानी कारभार करत असल्याचा आरोप देखील सुरेश जाधव यांनी यावेळी केला.
महाबळेश्वर तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी येऊन देखील अधिकारी व ठेकेदार यांच्या मिलीभगतमुळे निक्रुष्ट कामे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे पडलेल्या पुलाची जवाबदारी ठेवून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राजेश कुंभारदरे यांनी यावेळी केली.
तर उपअभियंता गोजांरी यांनी संबधित ठेकेदाराला नोटीस काढून कामाबाबत विचारणा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसैनिकांना दिली. निकृष्ट कामाचा पंचनामा झाला असताना संबधित ठेकेदार व उपअभियंता यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल नसल्याने प्रशासनाच्या मुग गिळून गप्प भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.