धाराशिव : खासदार ओमराजे निंबाळकर हे अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सकाळी 7 वाजता मॉर्निंग वॉकला बाहेर पडले असतानाच गोवर्धनवाडी येथे त्यांच्या अंगावर भरधाव डंपर आला. मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवत त्यांनी उडी मारल्याने ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत.
या घटनेनंतर भरधाव डंपरचा पाठलाग करत चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं डंपर चालकाने पोलिसांना सांगितले आहे. रामेश्वर कांबळे असे या डंपर चालकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय हा अपघात होता की घातपात याचा देखील पोलिस शोध घेत आहे.
या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणात डंपर चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी 2019 मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशीव तालुक्यातील पाडोळी येथे गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला होता.
नेमके काय घडले?
ओमराजे गोवर्धनवाडी येथील राहत्या घरापासून काही अंतरावरच मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. व्यायाम करुन घरी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव डम्परचा त्यांना आवाज आला. त्यावेळी त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तेव्हा भरधाव वेगाने डंपर त्यांच्या दिशेने येत होता. त्यानंतर त्यांनी क्षणातच बाजूला उडी घेतली. त्यामुळे ते अपघातातून थोडक्यात बचावले.