वाई – पसरणी घाटामध्ये नागेवाडी फाट्यावर सोळा नंबरजवळ शिवशाही व लक्झरी बसची समोरासमोर जोरदार धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात 30 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी वाई व पाचगणी येथील शासकीय व खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. चार प्रवाशी अत्यवस्थ झाल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात आले आहे.
पाचगणीहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणारी बस पुण्याला जाताना पसरणी घाटात बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. नागेवाडी वळणावर गाडी बाजूच्या कठड्यावर दाबण्याचा प्रयत्न केला असता पुण्याहून येणाऱ्या शिवशाही बसला जोरदार धडक दिली. लक्झरी बस संरक्षक कठड्यावर चढल्याने पलटी झाली. संरक्षक कठड्याच्या बाजूला दोन हजार फूट खोल दरी होती. आरसीसी बांधकाम असल्याने बसची जोरदार धडक होऊनसुध्दा कठड्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाईकरांनी आज पुन्हा एकदा गुजरात बसच्या अपघाताचा थरार अनुभवला. अपघातानंतर दोन्ही बाजूला दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प होती. पोलिसांनी अथक प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती ही लग्नाचे वऱ्हाड घेऊन लक्झरी बस (एम एच 11 एल 5999) पाचगणीहून पुण्याकडे जाताना पसरणी घाटात गाडीचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे पुण्याहून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला (एम एच 06 बी डब्ल्यू 3675) समोरून धडक दिल्याने लक्झरी बस कठड्याला धडकून पलटी झाली. यामध्ये लग्नाचे 30 वऱ्हाडी जखमी झाले. या जखमींना वाईच्या शासकीय रुग्णालयात व खासगी रुग्णालयात तर पाचगणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व बेल एअर हॉस्पिटलमध्ये काही जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचगणीमध्ये दाखल केलेल्या चार गंभीर जखमींना पुण्याला हलविण्यात आले आहे.
पाचगणी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये राकेशकुमार जीवनकुमार (वय 24, रा. पिंगळो, उत्तराखंड), सोनाली रामचंद्र बिनेकर (वय 25, रा. प्रेमनगर, नागपूर), काशीबाई सावळाराम सपकाळ (वय 75, रा. वेंगळे, महाबळेश्वर), राही वसंत खेडेकर (वय 37), श्रावणी वसंत खेडेकर (वय 10, दोघी रा. सोलापूर), नंदा जयानंद काकडे (वय 60), जयानंद हरिश्चंद्र काकडे (वय 65), समिधा काकडे (वय 26, तिघे रा. मुंबई), विभूती नारायण तिवारी (वय 67), सुरेखा विभूती तिवारी (वय 58, दोघे रा. सिकंदराबाद), सीमा विवेक किरपेकर (वय 55), बाळासाहेब नारायणराव यादव (वय 69 रा. पुणे), प्रतिभा सुनील गिरने (वय 47), साधना राजू शिर्के (वय 54), राजीव रवींद्रनाथ शिर्के (वय 62), गौरी राजू शिर्के (वय 30 सर्व रा. पुणे). वाई येथील रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींमध्ये संदेश राजाराम काळोखे (वय 28), अश्विनी अशोक पवार (वय 55), रंजना बाळासाहेब यादव (वय 65), सायली पंकज पवार (वय 26), साधना महेश शर्मा (वय 55), अपर्णा संजय पाटील (वय 51), मनीषा वसंत केदारी (वय 53), विश्वनाथ रामदास माळी (वय 47), स्नेहप्रभा भापकर (वय 57, सर्व रा. पुणे), सुरेश भाऊसाहेब सोनवणे (वय 69, रा. फलटण), धनश्री सुरज पवार (वय 32), स्वरूप सुरज पवार (दोघे रा. सोलापूर), विणा विनोद मोरे, राज विनोद मोरे (रा. मुंबई), प्रभा प्रेमकिरण तिवारी (वय 50, रा. उत्तरप्रदेश), आलोक यादव (वय 22, रा. आंबेघर ता. जावळी) यांचा समावेश आहे. वाई व पाचगणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.