पुणे – रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकखाली घुसून कारचा भीषण अपघाता झाला आहे. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहूंजे क्रिकेट स्टेडियम परिसरात शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडाली. या भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका महिलेचा सहभाग आहे. पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातग्रस्त कार ही स्कोडा कंपनीची आहे. भरधाव वेगाने कार मुंबईच्या दिशेने जात होती. यावेळी गहूंजेच्या क्रिकेट स्टेडियम समोरच एक ट्रक बंद अवस्थेत उभा होता. मार्गाच्या बाजुला असलेल्या या ट्रकच्या खाली ही कार घुसली. आणि हा भीषण अपघात घडला.
पन्नास मीटर पासूनच ब्रेक लावल्याने चाकाचे व्रण मार्गावर स्पष्ट दिसत आहेत. यावरून गाडी अतिशय सुसाट वेगात असल्याचा अंदाज यंत्रणांनी वर्तविला आहे. शिवाय ही टक्कर इतकी जोराची होती की कारचा पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु आहे.