भाजपात प्रवेश म्हणजे अभय नाही – चंद्रकांत पाटील

अजित पवारांसह सर्व घोटाळेबाजांवर कारवाई अटळच

संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी चालू

सोलापूर, (प्रतिनिधी)  – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपाकडे मोठ्या प्रमाणावर “इनकमिंग’ चालू आहे. भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे त्यांच्या गैरकृत्यांना अभय दिले जाणार नाही. अजित पवार यांच्यासह सर्व घोटाळेबाजांची चौकशी चालू असून योग्यवेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याला भाजप मागेपुढे पाहणार नाही. माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी चालू असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केला. छगन भुजबळ जेलमध्ये गेले, अजित पवारांचे प्रकरण न्यायालयात असल्याचा दाखला त्यांनी यावेळी बोलताना दिला.

संजय शिंदे यांना किंमत मोजावी लागेल-
माढाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी भाजपशी गद्दारी केली आहे. त्याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. त्यांनी त्यांच्या साखर कारखान्यात सामान्य शेतकऱ्यांच्या सात बारावर कोट्यवधींची कर्जे उचलली आहेत. हा प्रकार चुकीचा आहे,या प्रकरणाची चौकशी सरकारने चालू केली आहे. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टे यांना जेलमध्ये जावे लागले त्याच धर्तीवर संजय शिंदे यांना जेलवारी करावी लागेल. अशा शिंदे यांच्या तीन प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

भाजप – शिवसेना महायुतीचे माढाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या मित्र पक्षातील खळखळ संपली असून भाजप – शिवसेना रिपाईसह इतर घटक पक्षांची युती अभेद्य असून महायुतीच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्रातील 11 पैकी 10 जागा महायुती जिंकेल असा दावासुद्धा त्यांनी यावेळी बोलताना केला. भाजपने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रचार करताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे घोटाळेबाज जेलमध्ये असतील अशी वल्गना केली होती , मात्र याच राष्ट्रवादीमधील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन शुद्धीकरण करत असल्याबाबत विचारले असता “आपला देश राजघटनेवर चालणारा आहे. त्यामुळे भाजपचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे. कायद्यांतर्गत ज्यांच्यावर कारवाई करायची आहे, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली आहे. भुजबळ दोन वर्षे आत राहिले, अजित पवारांची केस तीन वर्षे हायकोर्टात चालू आहे, न्यायालयाला आवश्‍यक असणारी सर्व कागदपत्रे शासनाने सादर केली आहेत. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निर्णय येऊ शकतो. त्यावेळी कोणालाही वाचविण्यात येणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.