बारामती (प्रतिनिधी) –सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तसेच वीजयंत्रणेतील संभाव्य धोके, अपघात टाळण्यासाठी बारामती परिमंडलात सुरू करण्यात आलेला “एक गाव-एक दिवस’ उपक्रम सर्वच विभागांमध्ये राबविण्यात यावा, असे निर्देश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत. उपक्रम राबविताना करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.
“एक गाव-एक दिवस’ उपक्रमातून महावितरणचे अभियंते व जनमित्र थेट गावात जाऊन वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करतात. वीजबिल दुरुस्ती आणि नवीन वीजजोडणीसाठी शिबिर घेतली जातात. यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे सावट असल्याने गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांना एकत्रित करणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्या उपक्रमातून गावे व परिसरातील वीजयंत्रणेच्या केवळ देखभाल व दुरुस्तीवर सध्या भर देण्यात येत आहे. मात्र, या उपक्रमादरम्यान गावांमध्ये वीजबिलांच्या तक्रारी किंवा नवीन वीजजोडणीचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
अनुदानासाठी प्राध्यापकांचे घरात आत्मक्लेश आंदोलन
मंचर, दि. 30 (प्रतिनिधी) -ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार (दि. 26) घरात बसून आत्मक्लेश आंदोलन केले. शासन आदेशानुसार विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना अनुदान मिळावे. घोषित किंवा अघोषित उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालये व तुकड्यांना 11 मार्च 2020च्या मंजुरीनुसार अनुदान घोषित करावे.
2 मे 2012 नंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता देऊन वेतन द्यावे, अकरावीची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालय स्तरावरच राबविण्याचे अधिकार द्यावेत. अशी माहिती शिक्षक महासंघाचे सरचिटणीस प्रा. लक्ष्मण रोडे व प्रा. सुनिल थोरात यांनी दिली.