नीरा, (वार्ताहर) – गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली केशकर्तनालये गुरूवार (दि.28) पासून सुरू झाली आहेत. मात्र, ग्राहक व कारागीरांच्या मनामध्ये करोनाची भीती कायम असल्याचे दिसत आहे. अनेकजण भीत भीतच दुकाने उघडत आहेत. सर्वसामान्य लोक सलूनमध्ये जाण्यासाठी धजावत आहेत.
करोनाने राज्यामध्ये पाय ठेवताच राज्य शासनाने अनेक आस्थापने बंद ठेवण्याचा तातडीने निर्णय घेतला होता. हॉटेल, चित्रपटगृह, मॉल, केशकर्तनालये व स्पा आदी बंद ठेवली होती. दोन महिन्यांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. सुरुवातीला दारू दुकाने सुरू झाली. यानंतर कापड दुकाने, इतर आस्थापने, व्यवस्थापने सुरू झाली. त्यानंतर सलूनची दुकाने सुरू करण्यासाठी सुद्धा नाभिक संघटनांकडून जोर धरला.
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात सलूनची दुकाने सुरू झाली आहेत. तरी जे कारागीर दुकानांमध्ये काम करणार आहेत. त्यांच्या मनामध्ये व जे ग्राहक दुकानांमध्ये जाऊन स्वतःचे केस कापून घेण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी जाणार आहेत. त्यांच्या मनामध्ये सुद्धा करोनाची धास्ती अजूनही कायम आहे. सलून दुकान उघडल्यानंतर सुरूवातीलाच संपूर्ण दुकान सॅनिटायझरिंग केले जाते. सर्व साहित्य निर्जंतुक केले जात आहे. ग्राहकांची नोंद घेतली जात आहे. अनोळखी लोक असतील तर त्यांची केस, दाढी करण्यासाठी नकार दिला जात आहे.
केशकर्तनालये सुरू झाली तरी ग्राहक फारच कमी प्रमाणात येत आहेत. आमच्याकडून दक्षता घेतली जात आहे. पण काम करणारे कारागीर व ग्राहक अजुनही इकडे यायला तयार नाहीत.
– बाळासाहेब गायकवाड,सलून व्यावसायिक, नीरा.