कोल्हापूर (प्रतिनिधी): प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास आणि विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी 2 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हुपरी येथील तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने या दोघांना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले.
लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना संसंर्गाच्या दृष्टिने सीपीआरमध्ये वॉर्ड बॉयची प्रथम कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती होणार आहे. काही दिवसानंतर त्यांना कायमस्वरुपी कामावर हजर करुन घेणार असल्याबाबत आरोपी लिपीक बट्टेवार (व. व.45, रा. 594 पंचरत्न कॉलनी, ठोबरे मळा कसबा बावडा) यांने तक्रारदाराला सांगितले होते.
तक्रारदाराने त्याला व त्याच्या भावास वॉर्ड बॉय म्हणून कामावर हजर करुन घेण्याबाबत सांगितले. बट्टेवार याने तक्रारदार आणि त्याच्या भावाला वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटी पध्दतीने कामावर हजर करुन घेण्यासाठी रितसर अर्ज स्वत:हा भरतो असे सांगून दोघांच्या आधारकार्डची झेरॉक्स व छायाचित्रे घेवून येण्यास सांगितले.
प्रथम कंत्राटी पध्दतीने सीपीआर येथे वॉर्ड बॉय म्हणून वरिष्ठांना सांगून घेणार त्यानंतर कायमस्वरुपी कामावर घेण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालय मुंबई आरोग्य विभागामधून काढून देण्यासाठी 5 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर आदेश देणार नाही, असे बट्टेवार यांने तक्रारदाराला सांगितले.
यानंतर केलेल्या लाचेच्या मागणीची तक्रार तक्रारदाराने 17 जून रोजी लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याच दिवशी पंच साक्षीदारांच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता त्यामध्ये 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
आज पुन्हा बट्टेवार याच्या लाच मागणीबाबत पडताळणी केली असता त्याने तक्रारदारकडून 5 लाखाची मागणी करुन पहिला हप्ता 25 हजार रुपयांचा स्वीकारण्याचे मान्य केले. उर्वरित रक्कम एकरकमी देण्यास सांगितले. 25 हजार रुपये लगेच घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात वाहनचालक बट्टेवार 25 हजार रुपये स्वीकारल्याने त्यास रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, जवान संदिप पडवळ, रुपेश माने, मयुर देसाई आदींच्या पथकाने केली.
2 हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात
तक्रारदार याने मे 2020 मध्ये हुपरी गावातील त्याच्या गटक्रमांक 1876 मधील शेतामध्ये बोरवेल मारली आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (व.व. 54, रा. प्लॉट क्र. 54 संभाजीपूर अण्णासाहेब चकोते शाळेसमोर) याच्याकडे 16 जून रोजी अर्ज दिला होता तेव्हा तक्रारदार कोतवाल मुदाळे यांना भेटले असता तलाठी शेरखाने बोरवेलची नोंद घेण्यासाठी 3 हजार रुपये मागत आहेत पैसे दिल्याशिवार ते तुमच्या बोरवेलची नोंद सातबाऱ्यावर करणार नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन भेटा असे सांगितले. त्याबाबत तक्रारदारने तलाठी शेरखाने विरुध्द तक्रार अर्ज दिला होता.
त्यानुसार आज हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज लावलेल्या सापळ्यात 2 हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला. हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवलदार मनोज खोत, जवान शदर पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर यांच्या पथकाने केली.
लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री क्रमांक 1064, 0231-2540989, व्हॉटस् ॲप क्रमांक- 7875333333, 9011228333 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक श्री. बुधवंत यांनी केले आहे.