हिमांशू
सरकारचं इंधन दरकपातीचं दिवाळी गिफ्ट सगळ्यांना मिळालं असेल आणि ते आवडलं असेल, अशी अपेक्षा आहे. वास्तविक या गिफ्टविषयी “काहीजण’ अजून नाराज आहेत. हे “काहीजण’ इतरांपेक्षा खूपच वेगळे… अगदी परग्रहावरून उतरल्यासारखे! स्वस्ताईचा निषेध आणि महागाईचं खुलेआम कौतुक करणारा हा वर्ग देशातील जनता प्रथमच पाहात आहे.
वास्तविक 1992 मध्ये उदारीकरणानंतर अनेकांना भरपूर कमाईची संधी चालून आली. त्या संधीचा लाभ घेऊन नवश्रीमंतांचा एक वर्ग निर्माण झाला. बाजारात महागाई झाली तरी ज्यांना काही फरक पडत नाही, असा हा वर्ग मूळच्या, खानदानी श्रीमंतांपेक्षा अधिक खर्च करू लागला आणि याच वर्गाच्या जोरावर मार्केट चालतं, हे चाणाक्षपणे हेरून खास त्यांच्यासाठीच वेगवेगळी उत्पादनं मार्केटमध्ये आणली जाऊ लागली.
जाहिराती करतानाही याच वर्गाला “टार्गेट कस्टमर’ म्हणून डोळ्यापुढे ठेवलं जाऊ लागलं. आपलाच पूर्वीचा मित्र दिसला तर हळूच रस्ता बदलण्याची किंवा लक्ष असून नसल्यासारखं करण्याची कला या वर्गानं शिकून घेतली. महागाईचा विषय निघालाच तरी आतापर्यंत हा वर्ग तटस्थ राहात असे.
स्वतःला महागाईची झळ सोसावी लागत नाही याचं सुख या मंडळींना असायचं; पण काहींना ही झळ सोसत नाही, याचं व्यावहारिक भानही असायचं. आता अशा कुटुंबांना “फुकटे’ म्हणून संबोधून हे “काहीजण’ प्रत्यक्ष रिंगणात उतरलेत… महागाईच्या समर्थनार्थ!
एकवेळ महागाई आपला पिच्छा सोडेल; हे समर्थक अजिबात सोडत नाहीत. “पटलं, पटलं’ म्हणत पळ काढणं हाच एकमेव उपाय! एकीकडे महागाई, दुसरीकडे तिचे समर्थक तर तिसऱ्या कोपऱ्यावर फसवणूक करणारे टपलेले असतात. पेट्रोल, डिझेलच्याच बाबतीत बोलायचं झाल्यास गुजरातच्या पेट्रोकेमिकल खात्याच्या मंत्र्यांनाच पेट्रोल पंपावर हा अनुभव आला.
“मापात पाप’ करणाऱ्या या पंपचालकाबद्दल मंत्रिमहोदयांना अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. घरापासून अगदी जवळ असलेल्या या पंपावर मंत्रिमहोदय कोणताही लवाजमा न घेता खासगी गाडी घेऊन पेट्रोल भरायला गेले. संशय आल्यामुळं त्यांनी स्टॉक रजिस्टर पाहायला मागितलं. दररोज किती स्टॉक आला आणि किती संपला, याची माहिती गेल्या चार-पाच दिवसांपासून लिहिलेलीच नव्हती.
(दर मात्र दररोज न चुकता बदलले जात होते.) हे पाहून मंत्रिमहोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि पंपच सील करून टाकला. लिटरमागे काही मिलीलिटर पेट्रोल आणि डिझेल कमी दिलं जात होतं. मागेही असा “प्रोग्राम’ केलेली “चिप’ पंपांवर बसवून फसवणूक केली जात असल्याचं स्पष्ट झालं होतं. एकीकडे महागाईचे फटके आणि दुसरीकडे अशी फसवणूक होत असेल तर लोकांनी जायचं कुठे पेट्रोल, डिझेल भरायला? सगळेच जण काही नेपाळ सीमेजवळच्या गावांत राहात नाहीत.
हे या मालिकेतलं एक वेगळंच उपकथानक आहे. नेपाळ-भारत सीमेवर दोन्हीकडच्या लोकांना मज्जाव नसल्याने पेट्रोल भरण्यासाठी नेपाळमध्ये जाणारे लोक आहेत. बिहारमधील रक्सौलमध्ये (नेपाळ सीमेलगत) पेट्रोलचा दर 107.92 आणि डिझेलचा दर 92.98 रुपये प्रतिलिटर
(दिवाळी गिफ्ट वजा करून!) नेपाळमध्ये 132.25 नेपाळी रुपये म्हणजे 82.65 भारतीय रुपयांत पेट्रोल आणि 115.25 नेपाळी रुपये म्हणजे 72.03 रुपयांत डिझेल! नशीब, नेपाळ वगळता इतर देशांच्या सीमा एवढ्या खुल्या नाहीत!