अरब व इस्रायल यांची शांतता परिषद?
कैरो, दि. 9 – यूनोच्या अधिपत्याखाली अरब व इस्रायल यांची शांतता परिषद भरवावी यासाठी मॉस्को, वॉशिंग्टन व कैरो यांचेदरम्यान संपर्क साधण्यात आला आहे, असे अल अहराम पत्राने जाहीर केले आहे. ही परिषद जीनिव्हा येथे भरेल पण ती केव्हा ते या पत्राने जाहीर केलेले नाही.
ही शांतता परिषद भरेल ती यूनो सुरक्षा मंडळाच्या 242 साव्या ठरावानुसार, असे प्रतिपादन करण्यात आले आहे. व्याप्त अरब प्रदेश इस्रायलने मुक्त करावा व पॅलेस्टाइन लोकांचे हक्क सुरक्षित राखावेत. इजिप्तचे अध्यक्ष सादात यांनी सर्व अरब राष्ट्रांकडे खास दूत पाठवून डॉ. किसिंजर यांची योजना त्यांना समजावून दिली आहे. मात्र काही अरब राष्ट्रांना युद्धबंदी मान्य नाही.
लाटणे टाका, दांडके घ्या! महिलांना नवी चेतावणी
पुणे – “कधी बांगड्यांचा आहेर, कधी हातात लाटणे घेऊन मोर्चा हा बायकीपणा हवा कशाला? त्याऐवजी हातात दांडके घेऊन बायकांनी मोर्चा काढणे जरूर आहे. प्रसंगी अन्याय करणाऱ्याविरुद्ध त्याचा वापरही महिलांनी करावा’, अशी चेतावणी संसोपाच्या नेत्या श्रीमती इंदूताई केळकर व श्रीमती शांता नाईक यांनी एक पत्रक काढून दिली आहे.
महिलांनी चालविलेल्या लढ्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पण इंदूताई केळकर आणि शांता नाईक पुढे म्हणतात, लाटणे हे महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीक आहे. शक्तीचे नाही. संदर्भात द्रौपदी, रझिया सुलतान, झांशीची राणी, चांदबीबी यांचा आदर्श स्त्रियांनी स्वीकारावा!