दौंड -दौंड शहरात बांधकाम अंगावर पडून ठेकेदार असलेल्या तरूणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. दौंड शहरातील वडार गल्ली येथे 9 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. राहुल नाना घाडगे (वय 28, रा. सिद्धार्थनगर, दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे.
दौंड शहरातील वडार गल्ली येथे रणजीत नगरकर यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामाचे तोंडी कंत्राट रवी घाडगे व त्यांचा भाऊ राहुल घाडगे यांना देण्यात आले आहे.
सकाळी बांधकामाच्या सेंट्रींगच्या फळ्या काढण्याचे काम सुरू असताना पोटमाळ्याचा कॉंक्रिटचा बीम अंगावर पडला. यावेळी राहुल घाडगे याचा त्याखाली सापडून जागीच मृत्युमुखी पडला.
राहुल घाडगे याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेची वार्ता शहर परिसरात पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.दौंड उपजिल्हा रूग्णालयात राहुल घाडगे याच्या पार्थिवाचे विच्छेदन करण्यात आले.
दौंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे. तसेच अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.