– हिमांशू
कुणाचंच नीट जमेना आणि अडलेलं घोडं पुढे सरकेना. दोन्ही बाजूंनी सगळं आलबेल असल्याचं अनेकदा सांगून झालं, तरी अनेक मतदारसंघांत उमेदवाराची घोषणाच होईना. कुठं उमेदवार तयार आहे तर पक्ष अडकलेला. कुठं दोन्ही तयार आहे, तर चिन्ह कुठलं घ्यायचं याच्यावरून ओढाताण. मुहूर्तामागून मुहूर्त गेले तरी फॉर्म भरता येईना.
आत्ता होणार, मग होणार, उद्या होणार, दोन दिवसांत होणार, अशा बातम्या देऊन थकलेल्या काही माध्यमांनी मग नेहमीची हुकमी अस्त्रं बाहेर काढली. वेगवेगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या कुंडल्या आणि त्यांचं भवितव्य वगैरे सांगायला सुरुवात केली. मोठमोठ्या ज्योतिषांना पाचारण केलं.
कुणाचे ग्रह मे महिन्यात तर कुणाचे जूनमध्ये बदलणार असं सांगितलं जाऊ लागलं. लोकांना भारी इंटरेस्ट कुंडल्यांमध्ये. विश्वास नाही, असं म्हणणारेही हटकून आकर्षित होणारच! पण हे आकर्षण खास आपल्याच लोकांना आहे असं मात्र नाही. जगात सगळीकडे ग्रहतार्यांचं भ्रमण आणि भली-बुरी फळं याबद्दल लोकांना आकर्षण आहे. काही ठिकाणी त्याचा अतिरेकही बघायला मिळतो.
उदाहरणार्थ, सोमवारच्या सूर्यग्रहणानंतर अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये घडलेली घटना भल्याभल्यांचा थरकाप उडवणारी. असंख्य लोक ग्रहणात डायमंड रिंग वगैरे बघण्यात गुंतलेले असताना काहीजण ग्रहणाच्या कथित प्रभावांमुळे चिंतेनं ग्रासलेले. लॉस एंजेलिसमधली डॅनियल जॉन्सन ही त्यापैकी एक ज्योतिषी महिला.
राशींवरून लोकांचं भविष्य सांगणारी आणि लोकांमधली नकारात्मक ऊर्जा दूर करणारी ही महिला स्वतः मात्र ग्रहणामुळे प्रचंड ताणाखाली होती. ग्रहणाच्या काही दिवस आधी तिनं ट्विट केलं होतं, की हे सूर्यग्रहण म्हणजे आध्यात्मिक युद्धाचा इशारा आहे. प्रत्येकानं मन शुद्ध ठेवावं आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. डॅनियलला या ग्रहणात नेमकं काय दिसलं, हे कळायला मार्ग नाही.
पण ग्रहणानंतर तिनं तिच्या पतीवर धारदार शस्त्रानं वार केले आणि त्याला ठार मारलं. नंतर स्वतःच्या दोन मुलींना घेऊन ती गाडीतून बाहेर पडली. एक मुलगी नऊ वर्षांची आणि दुसरी अवघ्या आठ महिन्यांची. ताशी 160 किलोमीटर वेगानं गाडी चाललेली असताना तिनं दोन्ही मुलींना गाडीतून बाहेर फेकून दिलं. धाकटीचा जागीच मृत्यू झाला आणि दुसरी हॉस्पिटलमध्ये आहे. मुलींना फेकल्यावर काही वेळातच तिची गाडी झाडावर धडकली. डॅनियलला इतका वाईट मृत्यू आला, की तिचा मृतदेहसुद्धा ओळखता येत नव्हता.
हे सगळं फक्त एका ग्रहणामुळे घडलं? ग्रहतार्यांच्या हालचालींचा अर्थ लावणार्या ज्योतिषी महिलेला आध्यात्मिक युद्धाचे पडघम ऐकू आल्यामुळे हे घडलं. मृत्यूपूर्वीच्या पोस्टमध्ये तिनं म्हटलं होतं, की जग खूप वेगाने बदलतंय, चांगल्यापेक्षा वाईट वाढतंय आणि आपण कोणत्या बाजूनं राहायचं, हे ठरवण्याची वेळ आलीये.
डॅनियलचं हे म्हणणं खरं आहे; पण इतके भयानक मनसुबे मनात न ठेवता सांगितलं असतं तरी ते खरंच ठरलं असतं. हे जगच सोडून जावं, इतकं वाईट ते नक्कीच झालेलं नाहीये. अमेरिकेतसुद्धा ग्रहणावेळी एक मोठी खार सूर्याला गिळते, असं मानणारे लोक आहेत हे मान्य; पण त्याच अमेरिकेत सूर्यग्रहणाचा मुहूर्त साधून लग्न करणारी चारशे जोडपी आहेत. ग्रहणकाळात तीन रॉकेट सोडणारी नासासारखी संस्था आहेच ना?