शुक्रवार सायंकाळपर्यंत शिल्लक राहिले फक्त 572 बेड
पुणे – करोना बाधितांसाठी महापालिकेने सुमारे सहा हजार बेड नियंत्रणाखाली आणले असून, शुक्रवार संध्याकाळपर्यंत त्यातील 572 बेडच शिल्लक होते. वेगाने वाढणाऱ्या करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नेमले आहे.
शहरात दररोजची नवी करोना बाधित संख्या साडेचार हजारांपुढे गेली आहे. महापालिकेने 111 रुग्णालयांमधील 5 हजार 942 बेड करोना बाधितांसाठी राखीव ठेवले आहेत. यात 9 रुग्णालये ही सरकारी, महापालिकेची आणि जम्बो करोना रुग्णालय आहेत. तर उर्वरित 102 रुग्णालये ही खासगी आहेत. राखीव बेडमध्ये ऑक्सिजन विरहित आणि असलेले, अतिदक्षता विभागातील व्हेंटिलेटर असलेले आणि नसलेले बेड आणि विलगीकरण बेड यांचा समावेश आहे.
जम्बोचा समावेश करून सरकारी रुग्णालयात एकूण 1,647 बेड आहेत. त्यातील 192 च बेड शिल्लक आहेत. खासगीमध्ये 4 हजार 295 बेड करोना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आले असून, त्यातील 380 बेडच सध्या शिल्लक आहेत. या सगळ्यात व्हेंटिलेटर बेडची संख्या सर्वात कमी असून, ऑक्सिजन बेडची संख्या सर्वाधिक आहे. 3 हजार 948 ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले आहेत.
खबरदारी म्हणून ऑक्सिजन बेडची होतेय मागणी
सध्या करोनाचा प्रादुर्भाव हा गृहनिर्माण संस्था, सोसायटी, बंग्लो सोसायटी या उच्च मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गामध्ये अधिक आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबच विलगीकरणात आहे. यातील एखाद्याला जर काही त्रास होत असेल तर थेट ऑक्सिजन बेडची मागणी केली जात आहे. ऑक्सिजन लागत नसले तरी खबरदारी म्हणून ते घेतले जात आहे. यामुळे ज्यांना ऑक्सिजनची खरोखरीच आवश्यकता आहे, त्यांना ते मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.