वडगाव मावळ – वडगाव मावळ शहरात सुमारे 11 हजार बांधकामे अनधिकृत असून त्यात नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांचा देखील समावेश आहे. त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे नावे असलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामाचे अनुषंगाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी ऍड. धनंजय काटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तर प्रशासनाने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा काटे यांचा आरोप प्रशासनाने मात्र फेटाळला आहे.
काटे यांनी बुधवारी (दि.20) वडगाव येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.काटे यांची महादजी शिंदे स्मारकाजवळ आमची इमारत असून ती अनधिकृत असल्याचे नगरपंचायतीचे म्हणणे असून काटे यांना ती पाडण्यासाठी नोटीस बजावली आहे. त्यानंतर काटे यांनी त्या नोटीशीविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. माहिती अधिकारखाली त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वडगाव शहरात नोंदणीकृत बांधकामाची संख्या 7177 आहे.465 बांधकामे वैधानिक प्राधिकरण (पीएमआरडीए) यांचेकडून बांधकाम परवानगी मिळालेली असुन, 3 फ़ेब्रुवारी 2018 पासून वडगाव नगरपंचायतीने 65 बांधकामांना परवानगी दिलेली आहे. वर नमूद बांधकाम परवानगी दिलेल्या बांधकामापैकी 54 बांधकामास पीएमआरडीएने यांनी तर 40 बांधकामास नगरपंचायतीने याव्यतिरिक्त नगरपंचायत हद्दीत सुमारे 5 हजार अनोंदणीकृत बांधकामे झालेल्या सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे.
तसेच ग्रामपंचायतीला बांधकाम परवाने देण्याचे अधिकारी नव्हते. शहरातून जाणाऱ्या राज्य मार्ग क्रमांक 126 या रस्तालगतची बांधकाम नियंत्रण रेषा, इमारत रेषा ही रस्ताच्या मध्यभागापासून 20 मीटर असल्याचे देखील नमूद केले आहे. नगरपंचायतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये वर केलेले निकष पाहता शहरातील 624 बांधकामे वगळता उर्वरित सर्व नोंदणीकृत व अनोंदणीकृत बांधकामे ही अनधिकृत व बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होते. यापैकी काही बांधकामे नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची देखील आहेत. त्यामुळे त्यांची पदे रद्द करून 6 वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.