हिमांशू
कौन नया खिलाडी आया है? नुसता खिलाडी, अफलातून खिलाडी, सबसे बडा खिलाडी, अनाडीसोबतचा खिलाडी, खिलाडीयों का खिलाडी की इंटरनॅशनल खिलाडी आला? “कॅम्पेन’ करत आला, इलायची चघळत आला, की “आय ऍम सॉरी’ म्हणून माघार घेत आला? ताकाला जाऊन भांडं लपवण्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कळू नये, इतका रे कसा हा भोळा खिलाडी? खिलाडी तरी कसं म्हणावं? जे नातं सोड्याच्या आणि दारूच्या जाहिरातीचं, तेच इलायची आणि गुटख्याच्या जाहिरातीचं.
जाहिरातीत दाखवलेल्या ब्रॅंडचा सोडा मार्केटमध्ये उपलब्ध असतोच असं नाही. (काही ठिकाणी नावही माहीत नसतं, असा अनुभव येतो). किंबहुना सोडा ही एकमेव अशी वस्तू आहे, जी उपलब्ध नसतानासुद्धा तिची जाहिरात केली जाऊ शकते. इलायची आणि पान मसाल्याची तर बातच न्यारी. नुसती इलायची पाकिटात भरून विकायची आणि तिची जाहिरात करायला तीन-तीन स्टार लोकांना आणायचं, हे कुणाला तरी शक्य आहे का? यामागचं अर्थकारण “खिलाडी’ माणसाला कळू नये?
जाहिरात फक्त दिसली आणि लोकांनी पार खुर्दा करून टाकला “खिलाडी’चा! त्याचाच जुना व्हिडिओ टाकून दिला सोशल मीडियावर! त्यात खिलाडी म्हणतोय, “गुटखा, तंबाखूची जाहिरात अजिबात करणार नाही’! आपलेच बोल ऐकून खिलाडी झटक्यात गुडघ्यावर आला राव! म्हणाला, माझ्या चाहत्यांनो, मला माफ करा. पुन्हा अशी चूक आयुष्यात करणार नाही! खिलाडीच्या चाहत्यांचा राग समजून घेता येऊ शकतो; पण जे घडलं त्यात खिलाडीचा काय दोष? त्याला सांगितलं असेल, इलायचीची जाहिरात करायचीय. कॅमेऱ्यासमोर खिलाडीनं जे खाल्लं तीही इलायचीच असेल… पण ब्रॅंड तर गुटख्याचा! ही गोष्ट आपल्याला माहीतच नव्हती, असं सांगून खिलाडी “टाइमप्लीज’ घेऊ शकला असता की नाही? पण खिलाडीने तसं केलं का..? अजिबात नाही. उलट हात जोडून तो ट्विटरवर आला.
म्हणाला, मी माघार घेतो. या जाहिरातीतून जे मानधन मला मिळालंय, त्याचा मी चांगल्या कारणासाठी उपयोग करीन… अर्थात, मानधनाचा आकडा सांगितला असता तर अधिक बरं झालं असतं, कारण ते घसघशीत होतं, असं फिल्लम लाइनमधल्या माध्यमांचं म्हणणं आहे. खरं तर सॉरी वगैरे म्हणायचीही गरज नव्हती. “सरोगेट ऍडव्हर्टायजिंग’चे हे फंडे आता कॉमन झालेत. मैदानात चौकार-षटकार मारणारे लोक “गेम बदला’ म्हणून मोबाइल गेमची जाहिरात करतात. जाता-जाता प्रचंड स्पीडमध्ये म्हणतात- स्वतःच्या जबाबदारीवर खेळा बरं का! “तेवढंच वाक्य फास्ट का बोलता,’ असा प्रश्न कुणी विचारतो का? मग खिलाडीनं गुटख्याची जाहिरात केली की इलायचीची, हे विचारणं कितपत रास्त? कारण खरा मार्केटिंग फंडा कुणाला कळलाच नाही.
आमच्या खास सूत्रांनी केलेल्या विश्लेषणानुसार, या जाहिरातीची चर्चा होणार हे खिलाडीला आधीपासून ठाऊक होतं आणि संबंधित कंपनीलासुद्धा! हल्ली एखाद्या गोष्टीचं “बूमरॅंग’ झालं तरी ते आपल्याच फायद्याचं असतं असं मार्केटिंगमधले तज्ज्ञ सांगतात. म्हणजे, निगेटिव्ह प्रसिद्धी झाली म्हणून काही बिघडत नाही. उलट फायदाच होतो. कारण पॉझिटिव्ह प्रसिद्धीपेक्षा निगेटिव्ह प्रसिद्धीचा “स्पॅन’ मोठ्ठा असतो म्हणे! जाहिरात काय… येईल आणि जाईल. चर्चा मात्र टिकेल. म्हणजे कंपनीच खरी खिलाडी!