नवी दिल्ली – भारताचे माजी वेगवान गोलंदाज अभय कुरुविला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय निवड समितीचा सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यावर काही आठवड्यांनंतर कुरुविला यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी धीरज मल्होत्रा यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे महाव्यवस्थापक हे पद रिक्त होते.
53 वर्षीय कुरुविला हे 90च्या दशकात भारतीय संघातील वेगवान गोलंदाज म्हणून पुढे आले होते. परंतु त्याची कारकीर्द फार काळ टिकली नाही. कुरुविला यांनी 10 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कुरुविला यांनी 10 कसोटीत 35.7 च्या सरासरीने 3.03 च्या इकॉनॉमीने 25 विकेट घेतल्या होत्या.
त्यांनी देशासाठी 25 एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत. यात त्यांनी 4.72च्या इकॉनॉमीसह 25 विकेट घेतल्या. मुंबईचे खेळाडू असलेल्या कुरुविला यांनी 2000साली सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता त्यांची बीसीसीआयच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.