नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षनिधीत निवडणुकांनंतर मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. त्या पक्षाकडे 2019-20 या आर्थिक वर्षात 111 कोटी रूपयांहून अधिक निधी होता. मात्र, पुढील आर्थिक वर्षात (2020-21) तो घटून अवघा 13 कोटी 84 लाख रूपये इतका झाला.
शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे वार्षिक लेखा परीक्षण अहवाल सादर केला. त्यामधून निवडणुकांमुळे शिवसेनेचा निधी मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले. देशात 2019 यावर्षी लोकसभा निवडणूक झाली. त्याच वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही झाली. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने 24.30 कोटी रूपये खर्च केले. त्यापेक्षा दुपटीहून अधिक निधी (53 कोटी रूपये) शिवसेनेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खर्चावा लागला.
त्या दोन्ही निवडणुकांवेळी शिवसेनेची भाजपशी युती होती. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्यातील युती तुटली. शिवसेनेने 2020 मधील बिहार विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी पक्षाने 22 उमेदवार रिंगणात उतरवले. बिहार निवडणुकीसाठी शिवसेनेने 11 लाख रूपयांहून अधिक निधी खर्च केला.