शिवसेनेकडून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू
मुंबई : अनेक अडथळ्यातून मार्ग काढत गेल्या सोमवारीच महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र विस्तारानंतर आता मंत्र्यांचे नाराजीनाट्य सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. कारण राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी सकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्याचे प्रयत्न शिवसेना नेतृत्त्वाकडून सुरू आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांनी या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यमंत्रीपद मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज झाले होते. त्यातच औरंगाबादमधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रचनेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ येणार असल्यामुळे ते जास्त नाराज झाले. ज्या पक्षामधून बाहेर पडून मी शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पक्षाला अकारण पाठिंबा देण्याची वेळ आपल्यावर येते आहे. हे मला मान्य नाही, अशी अब्दुल सत्तार यांची भूमिका आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना पाठविण्यात आले आहे. या दोघांमध्ये सध्या बंद खोलीत चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीआधी अब्दुल सत्तार यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.