मदन भोसले यांना भाजपची अधिकृत उमेदवारी जाहीर
वाई – शिवसेनेच्या वाट्याला असणारा वाई विधानसभा मतदार संघ आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे माजी आमदार मदन भोसले यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने वाई विधानसभा मतदार संघात पुन्हा आबा-दादा यांच्यातच तुल्यबळ लढत पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी विरुध्द भाजपा असा सामना वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदार संघात रंगणार आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री. देशपांडे यांच्या हस्ते मंगळवारी मदन भोसले यांना ए बी फॉर्म देण्यात आला. वाई विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेला जाहीर झाल्याने मदन भोसले यांच्या भाजप उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
हा मतदार संघ भाजपला न सुटल्यास मदन भोसले काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. परंतु मदन भोसले यांनी फक्त भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याची भूमिका घेतल्याने व तसा शब्द भाजप श्रेष्ठींनी दिला असल्याने आज मदन भोसले यांना वाई विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून भाजपने आपला शब्द पाळल्याचे अधोरेखित झाले. दरम्यान, पक्ष वेगळा असला तरीही पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांमध्येच लढत पहायला मिळणार आहे.