Aayush Sharma And Arpita Khan | बॉलीवूड अभिनेता आयुष शर्माचा ‘रुस्लान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त झालेल्या एका मुलाखतीत त्याने विविध मुद्यांवर भाष्य केले. आयुषची पत्नी आणि भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खानला तिच्या लुक मुळे ट्रोल केले जाते. यावरुनही त्याने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.
यावेळी आयुष म्हणाला “अर्पिताच्या रंगाची लोक चेष्टा करतात. लोक तिला लहानपणापासून ‘काली’ म्हणतात आणि ती लोकांची अजिबात काळजी करत नाही. तिला या गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही. तुम्हाला तिला नाही बघायचंय तर नका बघू. अनेकजण मला तू जिमला जातो तर तू तिला पण घेऊन जा असा सल्ला देतात. पण ती ठरवेल तिला जायचंय की नाही जायचं.”
पुढे आयुष तिचे कौतुक करत म्हंटला, “मी जेव्हा लग्न केलं तेव्हापासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप बोललं जातंय. खूप जणांनी माझ्या अर्पिताच्या वजनाबाबत त्यांचं मत मांडले आहे. आमच्या कुटुंबाजवळ असणाऱ्या लोकांना माहीत आहे की, ती दिवसभर अहिल आणि आयतबरोबर असते. या सगळ्या गोष्टींत तिला मदत करायला कोणी इतर व्यक्ती नसते. तिनं स्वत: आमच्या दोन्ही मुलांना मोठं केलं. ती नेहमी म्हणते, की दुसरं कोणी आपल्या मुलांना वाढवलं, तर त्यांच्यावर चांगले संस्कार कसे होतील?”
आयुष शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं, याआधी तो ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ चित्रपटात दिसला होता. तर त्याच्या आगामी ‘रुस्लान’ चित्रपटात सुश्री मिश्रा, विद्या मालवडे आणि जगपती बाबू हे कलाकारही दिसणार आहेत. २६ एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.