बहिण अर्पितासोबत कुटुंबीयांनी केले बाप्पाचं स्वागत
भारतात विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सर्वाधिक धूम असते. गणेश चतुर्थीनिमित्त बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी गणपती बाप्पांची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली आहे. जरी यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाच सावट असलं तरी श्री गणेशाप्रति भक्तीमध्ये कोणतीही कमी दिसून येत नाही. सगळीकडे गणरायांचे मंगलमय वातावरणात आगमन होताना दिसत आहे.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या गणेशोत्सवाबाबतही सर्वांनाच उत्सुकता असते. अभिनेता सलमान खान यांच्या घरी देखील दरवर्षीप्रमाणे गणरायांचे आगमन झालं आहे.
सलमान खानची बहीण अर्पिता ही गणेशाची मूर्ती घेऊन भाऊ सोहेल खानच्या घरी पोहोचली. यादरम्यान, अर्पिताने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केला होता आणि मास्क देखील घातला होता. ती आपल्या हातात गणपतीची मुर्ती घेऊन जाताना दिसली.
गाडीतून गणेशाची मूर्ती आणली गेली, तेव्हा प्रथम अर्पिताने गणेश मूर्तीची पूजा केली. उदबत्ती, अगरबत्ती दाखवून नारळ देखील फोडला. अर्पिताशिवाय इतर कुटूंबाचे सदस्यही बाप्पांचे स्वागत करताना दिसले. कोरोनामुळे सर्वांनी मास्क देखील घातले होते.
अर्पितासोबत तिची बहीण अल्वीरा आणि आई सलमा देखील होती. सोहेल खान आणि हेलन हे देखील गणपतीचे स्वागत करताना दिसले. दरम्यान, सलमानचे कुटुंबीय ईद, दिवाळीसह प्रत्येक सण उत्साहाने साजरे करतात आणि या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब देखील एकत्र जमते.