शहरातील पंपावर अभिनव प्रयोग
पुणे – एकेकाळी सायकलींचे शहर असणाऱ्या पुणे शहरात अलीकडील काळात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्याचबरोबर पेट्रोल, डिझेलच्या मागणीतही वाढ झाली आहे. मात्र, अनेकदा वाहनांमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरून घेताना, पेट्रोलपंप चालकांकडून “मापात पाप’ केले जाते की काय, अशी शंका वाहनचालकांना येते. ही बाब लक्षात घेत, पुण्यातील आरटीओ परिसरातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर थेट ग्राहकांनाच पेट्रोल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरटीओ परिसरातील या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांच्या मदतीने पेट्रोल कसे भरायचे याची माहिती दिली जाते. तसेच, त्यांना प्रत्यक्षात गाडीमध्ये पेट्रोल भरण्यास सांगितले जाते. यामाध्यमातून ग्राहकांना पंपाच्या कामकाजाची माहिती होते तसेच भविष्यात त्यांना असणाऱ्या विविध शंकाचे निरसनही केले जाते. अर्थातच यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनादेखील केल्या असल्याचे पंपाच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत पंपाचे व्यवस्थापक गिरीश मानकर म्हणाले की, शहरातील प्रत्येक पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेट्रोलपंप चालकांकडून कमी पेट्रोल तर भरले जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. आमच्याकडेही याबाबत विचारणा होत असते. त्यामुळे थेट ग्राहकांनीच त्यांच्या गाडीत पेट्रोल, डिझेल भरून घेण्याची व्यवस्था आम्ही उपलब्ध करून दिली आहे. यामुळे त्यांना पंपाच्या कामाबाबत माहिती मिळेल, शिवाय भविष्यात पेट्रोल भरण्यासाठी “आत्मनिर्भर’ होण्यासही याचा फायदा होईल.