नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे मेहराउली मतदारसंघातून विजयी झालेले उमेदवार नरेश यादव यांच्या हत्येचा कट 20 दिवसांपुर्वीच शिजला होता. मात्र निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्या सभोवताली कार्यकर्त्यांचा गराडा असल्याने तो प्रत्यक्षात आणला जाऊ शकला नाही, अशी माहिती वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
दिल्ली पोलिसांच्या अतिरिक्त आयुक्त पदाच्या दर्जाचा असणाऱ्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. स्वत:चे नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर त्याने सांगितले की, आतपर्यंत तपासात हाती आलेल्या माहितीवरून हा प्रकार गॅंगवॉरमधील वाटत नाही. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता आहे. मात्र, तपास पूर्ण होऊन सूत्रधारासह सर्व आरोपी पकडेपर्यंत त्याविषयी काहीही बोलणे योग्य होणार नाही.
या प्रकरणात गॅंगवॉरची शक्यता नाकारण्याचे कारण विचारता हा अधिकारी म्हणाला, यादव यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा हल्ला गॅंगवॉरमधून झाला असावा असे वाटत नाही. मात्र तरीही तपासात आम्ही या मुद्याकडे दुर्लक्ष करणार नाही. हा खटला पोलिसांना न्यायालयात सिध्द करायचा असल्याने आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत.
मतमोजणी जवळपास संपूर्ण संपल्यानंतर आणि यादव यांना विजयी घोषीत केल्यावर ते आपल्या हितचिंतकांसह मंरिात दर्शन घेऊन परतत असताना एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यात अशोक मान नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र यादव या हल्ल्यातून बचावले. या घटनेनंतर वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ घटनास्थळावर पोहोचले. पोलिस या प्रकरणाचे सीसीटीव्ही फूटेज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
जरी आम्हाला सीसीटीव्ही फूटेज मिळाले नाही तरी आम्हाला यादव यांच्याकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. त्यायोगे आम्ही आरोपीच्या मुसक्या आवळू शकतो, असे एका सहाय्यक पोलिस आयुक्तांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू शकतो.