नवी दिल्ली -आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये कॉंग्रेस आणि आप या पक्षांत हातमिळवणी होण्याचे संकेत मिळत आहेत. तसे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गृहराज्यात भाजपसमोर आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
आपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना संभाव्य हातमिळवणीचे सूतोवाच केले. इंडिया या विरोधकांच्या नव्या आघाडीचे आप आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष घटक आहेत. ती आघाडी गुजरातमध्येही दिसेल. अद्याप हातमिळवणीची चर्चा प्राथमिक टप्प्यावरच आहे. पण, गुजरातमध्ये जागावाटपाचे सुत्र ठरवून आम्ही निश्चितपणे एकत्रित लढू. नियोजनानुसार सर्व घडल्यास यावेळी भाजप गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागा जिंकू शकणार नाही. आप कुठल्या जागांवर उमेदवार देऊ शकतो याची चाचपणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशातूनच आप विरोधकांच्या आघाडीत सहभागी झाला आहे, असे ते म्हणाले.
गढवी यांनी हातमिळवणीविषयी खात्री व्यक्त केली असली तरी कॉंग्रेसच्या गुजरात शाखेने लगेचच पत्ते खोलणे टाळले. गढवी यांनी मांडलेल्या भूमिकेवर गुजरात कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष दोशी यांनी सावध प्रतिक्रिया दिली. निवडणूकपूर्व आघाडीविषयी निर्णय घेण्याची बाब कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाच्या अखत्यारीतील आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचे आम्ही पालन करू, असे त्यांनी म्हटले.
कॉंग्रेस आणि आपच्या संभाव्य हातमिळवणीवर भाजपच्या प्रदेश शाखेने तातडीने प्रतिक्रिया दिली. मागील दोन निवडणुकांपासून लोकसभेच्या गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकत आहे. यावेळी सर्व जागा 5 लाखांच्या मताधिक्याने जिंकण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे. कुठल्याही आघाडीची आम्हाला बिल्कूल धास्ती वाटत नाही. आपने दिलेल्या माहितीमुळे तो पक्ष कॉंग्रेसची बी टीम असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा शाब्दिक टोला गुजरात भाजपचे प्रवक्ते ऋत्विज पटेल यांनी लगावला.