आमीर खान हे एक वेगळेच सॅम्पल आहे. त्याची प्रत्येक कृती वेगळी असते. त्याचा प्रमोशनचा फंडा एकदम हटके असतो. त्याचे चित्रपटही वेगळे असतात. एक दोन अपवाद सोडले तर त्याने चांगलेच चित्रपट केले आहेत. वर्षाला पाच चित्रपट करणाऱ्या नायकांपैकी तो नाही.
तर पाच वर्षांनी त्याचा एखादा चित्रपट येतो. हे सगळे तो ठरवून करतो. त्याचे कारण त्याला परफेक्शन हवे असते. त्यामुळे इतक्या वर्षात त्याचे अगदीच मोजके चित्रपट झाले आहेत. मात्र त्यातले दोन चार पडले असतील. अन्य चित्रपटांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. हे चित्रपट आजही बघितले जातात. त्याकरता आमीर विविध क्लूप्त्याही करत असतो.
पीकेच्या वेळी वेगवेगळ्या अवतारात तो भारतभर फिरला होता. 3 इडियटसच्या वेळीही वेगळीच मोहीम त्याने राबवली होती. छोट्या पडद्यावरही तो आला तर सत्यमेव जयते सारखा आगळावेगळा शो घेऊन आला. थोडक्यात करायचे काय हे त्याने ठरवले असते. केवळ काहीतरी करायचे म्हणून तो काही करत नसतो.
आता त्याचा कोणताही चित्रपट नाही. लालसिंह चढ्ढाचे काम झाले की होत आले आहे. त्यामुळे आमीर आता प्रमोशनच्या मोडमध्ये गेला असावा बहुतेक. त्याचे कारण म्हणजे तो आता बुध्दीबळ अर्थात चेस खेळणार आहे. तेही कोणाशी, तर ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याच्यासोबत.
येत्या 13 तारखेला हा सामना होणार असून त्याचे ट्वीट करण्यात आले आहे. चेकमेट कोविड असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे. त्यातून मिळणारे पैसे कोविडसाठीचा निधी म्हणून वापरले जाणार आहेत.
आता बघा, त्याने कामच असे सिलेक्ट केले आहे की त्याची सगळ्यांनाच दखल घ्यावी लागणार आहे. आमीर विशी आनंदसोबत चेस खेळणार? लोक बघणारच की हो…