कराड – अनंत चतुर्दशीला (दि. 28) खराडे, ता. कराड येथे गणपती विसर्जनासाठी गेलेला गणेश संतोष जाधव (वय 19) हा युवक सायंकाळी 6 च्या सुमारास कृष्णा नदीत बुडाला. त्याच्या शोधासाठी कराड पालिकेच्या पथकाकडून मोहीम सुरू आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गणेश जाधव हा घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी कृष्णा नदीत गेला होता.
पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. त्याला पोहता येत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच कराड पालिकेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी नदीपात्रात त्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले.
मात्र, अद्याप तो सापडला नसल्याचे मसूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले. गणेशला आई, वडील व एक लहान बहीण आहे. तो कराड येथील सगाम महाविद्यालयात शिक्षण घेत होता. पुणे येथे सैन्यभरतीची तयारी तो करत होता. गणेशोत्सवासाठी गावी आल्यानंतर ही दुर्घटना घडली.