सातारा – शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर दोन भरधाव दुचाकी वाहनांची काल (दि. 13) रात्री 11 च्या सुमारास समोरासमोर धडक होऊन, नंदन सुदीप भट्टड (वय 25, रा. लोखंडे मळा, शुक्रवार पेठ, सातारा) याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नंदन भट्टड हा मोळाचा ओढा येथून दुचाकीवरून येत होता.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाजवळ समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नंदनच्या डोक्याला गंभीर मार लागला.
दुसर्या दुचाकीवरील दोन तरुणही गंभीर जखमी झाले. तिघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान नंदनचा मृत्यू झाला.
इतर दोन तरुण अद्याप बेशुद्ध असून, त्यांची ओळख पटलेली नाही. नंदन भट्टड हा सिलेक्शन या दुकानाचे मालक सुदीप भट्टड यांचा मुलगा होता.