रहिमतपूर – मद्यपान करताना चेष्टामस्करीचे रूपांतर वादात होऊन, गणेश चंद्रकांत हापणे (वय 36) यांचा उजवा हात लाकूड कापण्याच्या मशीनने मनगटापासून कापल्याची घटना आर्वी, ता. कोरेगाव येथे घडली. गणेश हापणे यांच्यावर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विशाल मोहन बंडलकर याच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी, गणेश हापणे हे बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास मोटारसायकलवरून शेतात जाताना वाटेत कोंबडवाडी फाट्याजवळ एका हॉटेलमध्ये मद्यपान करत बसला होता. त्याच वेळी गावातील किसन जाधव व विशाल बंडलकर हेदेखील तेथे मद्यपान करत होते. तेव्हा किसन जाधव व गणेश हापणे यांच्यात चेष्टामस्करी सुरू होती.
विशाल बंडलकरला वाटले की, गणेशने त्याला शिवीगाळ केली. या रागातून विशाल बंडलकर हॉटेलबाहेर गेला. त्याच्या मोटारसायकलवर ठेवलेले झाडे कापण्याचे मशीन त्याने सुरू केले आणि तो गणेश हापणे यांच्यावर धावून गेला. विशालने मशीनच्या धारदार पात्याने गणेशचा उजवा हात मनगटातून कापला. यावेळी अतिरक्तस्राव झाल्याने विशाल हा तेथेच बेशुद्ध पडला.
ही घटना समजल्यावर नातेवाइकांनी गणेशला साताऱ्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सपोनि गणेश कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. खुडे तपास करत आहेत.